gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात श्री. संजीव दांडेकर आणि श्री. सुनील कांबळे यांचा निवृत्ती निमित्ताने शुभेच्छा समारंभ संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) मध्ये मुख्य लिपीक या पदावर कार्यरत असलेले श्री. संजीव दांडेकर आणि प्रयोगशाळा परिचर, जीवशास्त्र विभाग श्री. सुनील कांबळे यांचा महाविद्यालयातर्फे निवृत्तीनिमित्ताने निरोप आणि शुभेच्छा समारंभ दि. २९ मार्च रोजी संपन्न झाला. 

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी त्यांना महाविद्यालयातर्फे शाल, श्रीफळ आणि स्मृती चिन्ह देऊन गौरविले. आपल्या शुभेच्छापर मनोगतात प्राचार्यांनी श्री. कांबळे कार्यक्षमतेबद्दल गौरवोद्गार काढले. कोणतीही जबाबदारी टाकली तरी ती पूर्णत्वाला नेण्याची क्षमता श्री. कांबळे यांच्याकडे होती असे त्यांनी सांगितले. स्वतःवर आलेल्या मोठ्या संकटाला तोंड देऊनही त्यांनी आपल्या कामात कधीही कसूर केली नाही, ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले याचा उल्लेख प्राचार्यांनी केला. तसेच प्राचार्यांनी श्री. दांडेकर यांच्या सरळसाध्या आणि मितभाषी स्वभावाचा उल्लेख करून विनाअनुदानित भागाचे कोणतेही अकाउंट्‍सचे काम पूर्ण करताना त्यांनी अडचण येऊ दिली नाही, अशा शब्दात कौतुक केले. अशा दोन्हीही कर्मचाऱ्यांचा आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत राहावे असे आवाहन केले.

संस्थेच्यावतीने श्री. दांडेकर आणि श्री. कांबळे यांचा यथोचित सत्कार करून आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांनी गेल्या ३० वर्षांच्या काळात श्री. दांडेकर यांनी निरपेक्ष भावनेने केलेले काम आणि कार्यक्षमता यांचा उल्लेख करून त्यांच्याकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे सांगितले. तसेच श्री. कांबळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रातिनिधीक स्वरूपात शिक्षकेतर कार्यालयीन कर्मचारी श्री. महेश सरदेसाई यांनी त्यांचे सहकारी श्री. दांडेकर यांच्या काही आठवणींना उजाळा दिला आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा. शरद आपटे, वनस्पतीशास्त्र विभाग यांनी श्री. सुनील कांबळे यांच्यासोबत जीवशास्त्र विभागात काम करताना आलेले अनुभव विषद केले आणि त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने त्यांना श्री. विजय काकतकर यांनी कांबळे यांना धनादेश प्रदान केला.

सत्काराला उत्तर देत असताना कांबळे यांनी २९ वर्षांच्या काळात वेळोवेळी महाविद्यालय आणि संस्था यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला. या मदतीच्या जोरावरच आपल्या अपत्यांना चांगले उच्च शिक्षण देणे शक्य झाले त्यामुळे महाविद्यालय आणि संस्था यांचा मी आजन्म आभारी असल्याची भावना व्यक्त केली. श्री. दांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे, महाविद्यालयाचे तसेच आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मनापासून आभार मानले. कनिष्ठ लिपिक पदापासून सुरू करून मुख्य लिपिक पदापर्यंत पोहोचण्याचा ३० वर्षांचा प्रवास त्यांनी उलगडला. महाविद्यालयातून मिळालेल्या आठवणींची शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरेल अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. तसेच प्राचार्यांनी सुचवल्याप्रमाणे महाविद्यालयाला जेव्हा माझ्या अनुभवाची गरज असेल त्यावेळेला मी नक्की मदतीला येईन अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. सीमा वीर यांनी केले. या कार्यक्रमाला दोन्ही सत्कारमूर्तींचे कुटुंबीय, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, सर्व शाखांच्या उपप्राचार्या, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

निवृत्तीनिमित्ताने शुभेच्छा समारंभ निवृत्तीनिमित्ताने शुभेच्छा समारंभ निवृत्तीनिमित्ताने शुभेच्छा समारंभ
Comments are closed.