गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२६’ या उपक्रमांतर्गत वाचन पंधरवडा साजरा होत आहे. यानिमित्ताने दि. १ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत महाविद्यालयात वाचनपूरक आणि वाचनप्रेरक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याच वाचन-चळवळीचा एक भाग म्हणून दि. ६ जानेवारी रोजी संस्कृत विभागातर्फे कथावाचन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कोणत्याही संस्कृत कथेचे विद्यार्थ्यांनी प्रकट वाचन करणे असे या उपक्रमाचे स्वरूप होते. या कार्यक्रमाला कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाचे सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, कला शाखा उपप्राचार्या व संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, विभागातील अन्य प्राध्यापक प्रा. स्नेहा शिवलकर, प्रा. प्रज्ञा भट, प्रा. प्रीती टिकेकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. कल्पना आठल्ये यांनी वाचन पंधरवडा या वाचन प्रेरणाविषयक उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी रंजक व उद्बोधक अशा संस्कृत कथांचे प्रकट वाचन केले.
याप्रसंगी उपस्थित श्री. उत्पल वाकडे यांनी संस्कृत विभागाच्या प्रकट कथावाचन उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना वाचन उपक्रमासाठी मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या अभ्यास विषयासोबतच इतर विषयांच्या पुस्तकांचेही वाचन करणे अधिक ज्ञानवर्धक आहे असे सांगितले आणि अवांतर वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्याचबरोबर शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘वाचन पंधरवडा या उपक्रमाची’ सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. प्रीती टिकेकर यांनी केले.
![]() |
![]() |
![]() |



