रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात स्वातन्त्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या आत्मार्पणदिनाच्या निमित्ताने दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अपर्ण केले.आपल्या मनोगतामध्ये डॉ.साखळकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्र निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. जाज्वल्य राष्ट्र अभिमान हे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार आणि कृतीच्या केंद्रस्थानी होते, असे ते म्हणाले.रत्नागिरीमधील स्थानबद्धतेच्या कालावधीतील सावरकरांचे सामाजिक कार्य अधोरेखित करताना ते म्हणाले की, जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे आणि पतितपावन मंदिराची उभारणी आजही त्या कार्याची साक्ष देते.
राष्ट्रनिष्टा, देशभक्ती, वैज्ञानिक दृष्टीकोन, धाडसी वृत्ती हे स्वातंत्र्यवीर सावरकरांची गुण वैशिष्ट्ये होती.कामामधील निष्टा ही नावलौकिक मिळवून देते हे सावरकरांच्या कार्यावरून दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचार आणि कृतीचा वसा आणि वारसा घेऊन आपण मार्गक्रमण करू या असे आवाहन डॉ. साखळकर यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, शास्त्र शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि वाणिज्य शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. सीमा कदम तसेच अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर सर यांची उपस्थिती लाभली.
महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने या अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.
![]() |

