गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेली पोस्टर्स, रांगोळी तसेच स्त्रीवादी साहित्याचे ग्रंथप्रदर्शन मांडून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
या दिवसाचे औचित्य साधून महिला विकास कक्षातर्फे ‘स्टॉप व्हॉयलन्स अगेन्स्ट वुमेन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नुकत्याच घडलेल्या हैद्राबाद, उन्नाव येथील मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनांविषयीची अस्वस्थता, आक्रोश आणि निषेध व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
प्रा. आरती पोटफोडे यांनी प्रिय असिफा, प्रियांका, निर्भया अशा मायन्याने लिहिलेल्या पत्राचे वाचन करून पिडीत स्त्रियांच्या वेदनेला वाचा फोडली. यानंतर गंभीर झालेल्या वातावरणात विद्यार्थ्यांनी लैंगिक शोषणाचा विरोध करणारे फलक घेऊन मूक संचालन केले. प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील मानसी करंदीकर हिने महिला सुरक्षेविषयी स्वत: लिहिलेले स्फुट सदर केले. पीडितांना श्रद्धांजली अर्पण करताना समाजातील नकारात्मकता संपवण्याची ताकद युवा पिढीत असून बलात्काराच्या घटना ही समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड संपवण्यासाठी युवा पिढीने एकत्र येऊन पुढे यावे असे आवाहन करण्यात आले. महानायक अमिताभ बच्चन यांच्या युट्यूबवरील स्त्रीसक्षमीकरण कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रा. रश्मी भावे, प्रा. मीनल खांडके, प्रा. गौरी पटवर्धन, प्रा. आतिका राजवाडकर आणि विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद जांगळे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, महिला विकास कक्ष समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी उपस्थित होते.