दि. १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिन आहे; हा दिवस ‘युवा दिवस’ म्हणूनही सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित तसेच युवकांना करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ग्रंथांचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा येथे आयोजित करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या आणि रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. डी. मधाळे, संगणकशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. अनुजा घारपुरे, मराठी विभागाच्या डॉ. निधी पटवर्धन, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. सचिन सनगरे, प्रा. कृष्णात खांडेकर, प्रा. डी. एस. कांबळे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
डॉ. अपर्णा कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ‘अमेरिका येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे स्वामी विवेकानंद हे भारतमातेचे एक महान सुपुत्र होते. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील प्रमुख वृत्तपात्रांचे लक्ष वेधून घेतले.’ अशा या महान व्यक्तीच्या जीवनकार्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे; असे उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्यांचे विचार आपल्यासमोर ग्रंथ रूपाने आणण्याचे कार्य या ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रंथालयाने केले आहे; सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगून सर्वांना आजच्या युवा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचक गटाचा विद्यार्थी ओमकार आठवले याने तर आभारप्रदर्शन वाचक गटाची विद्यार्थिनी कु. सेजल मेस्त्री हिने केले. सदर ग्रंथ प्रदर्शन दोन दिवस प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचेसाठी खुले राहणार आहे.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२६’ या उपक्रमांतर्गत दि. ०१ जानेवारी ते दि. १५ जानेवारी २०२६ असा ‘वाचन पंधरवडा’ विविध वाचन प्रेरणाविषयक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या पंधरा दिवसांमध्ये वाचनविषयक उपक्रमांतर्गत निबंधस्पर्धा, ग्रंथ अभिवाचन, साहित्य संवाद, लेखक आपल्या भेटीला, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ दिंडी, सामुहिक ग्रंथवाचन, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्याचा अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गोष्टी आणि बोधकथा वाचन-कथन उपक्रम, पथनाट्य असे वाचन चळवळीला पुढे नेणारे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
