‘पीएमउषा’ म्हणजेच ‘प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान’ ही केंद्र सरकारची योजना असून या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचे एक उद्दिष्ट शिक्षकांना प्रशिक्षण देणे हे आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालय पीएमउषा योजनेस पात्र ठरले आहे. त्या अंतर्गत दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत एम.एस.एफ डी.ए. (महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमी) आणि एम.एस.डीड-आयसर (MS-DEED IISER), पुणे या संस्थेतील तज्ज्ञ मार्गदर्शक प्राध्यापकांना मार्गदर्शन करणार आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापनात झालेले बदल समजून घेऊन त्यानुसार कार्यपद्धती ठरविण्यास हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. वर्ग अध्यापनात विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग वाढवणाऱ्या पद्धती, कृती आधारीत अभ्यासपद्धती आणि मूल्यमापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती, तसेच या प्रक्रियेत तंत्रज्ञानाची उपयुक्तता या सर्व विषयांबाबत कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
या कार्यशाळेविषयी अधिक माहितीसाठी तसेच सहभागासाठी डॉ. विवेक भिडे व प्रा. प्रतीक शितूत यांना संपर्क करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.