गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील हिंदी विभागाच्यावतीने पीएम-उषाअनुदानअंतर्गत राबविण्यात आलेल्या ३० तासांच्या अनुवाद प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी दीपस्तंभ व डी. जी. पी. एस. स्टेशनचे सहायक अभियंता, मा. ललित प्रकाश उपस्थित होते. आपल्या कथनात ते म्हणाले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात अनुवाद कौशल्याला मोठे महत्त्व आहे. हिंदी, मराठी व इंग्रजीसारख्या भाषांतील अनुवादामुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी निर्माण होतात. महाविद्यालयात राबविण्यात येणारे असे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक क्षमतेत भर घालणारे आहेत.”
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत डॉ. शाहू मधाळेयांनी अभ्यासक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करताना अनुवाद कौशल्याचे शैक्षणिक व व्यावसायिक महत्त्व अधोरेखित केले. या प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे समन्वयक प्रा. कृष्णात खांडेकर यांनी अभ्यासवर्गाची संकल्पना व अभ्यासक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्यांसोबत व्यावहारिक अनुवाद क्षमता विकसित करणे हा या अभ्यासवर्गाचा मुख्य हेतू साध्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या अभ्यासवर्गात हिंदी-मराठी-इंग्रजी भाषांतील साहित्यिक व तांत्रिक अनुवाद, माध्यमांसाठी अनुवाद तसेच प्रत्यक्ष सरावाचा समावेश करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रमाणपत्र कोर्स समन्वयक डॉ. यास्मिन आवटे यांनी पत्रकारिता, माध्यमे, प्रशासन, शिक्षण व उद्योग क्षेत्रात अनुवादाच्या व्यापक संधी उपलब्ध असल्याचे अधोरेखित केले.
कार्यक्रमास पीएम-उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. चित्रा गोस्वामी यांनी शुभेच्छा दिल्या. गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी हिंदी विभागाच्या शैक्षणिक व उपक्रमशील कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृष्णात खांडेकर व आभारप्रदर्शन प्रा. गौरी बोटके यांनी केले.
![]() |

