जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार – २०२४’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला ‘राष्ट्रीय मतदार दिनी’ प्रदान करण्यात आला.
नवमतदारांमध्ये मतदार प्रक्रियेसंदर्भात जनजागृती होऊन मतदान प्रक्रियेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा, लोकशाहीप्रती त्यांच्या मनात आस्था निर्माण व्हावी आणि त्यांच्यात लोकशाही मूल्ये रुजावीत, या हेतूने भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणी आणि जनजागृतीविषयक विविध उपक्रम राबविले जातात. या आधीही राज्यशास्त्र विभागाकडून नवमतदार नोंदणी अभियानाचे आयोजन केले जात होते. प्रा. निलेश पाटील २०१७ मध्ये विभागात रुजू झाल्यानंतर त्यांनी हीच परंपरा अखंडितपणे सुरु ठेवली. विशेष म्हणजे नंतरच्या काळात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय आणि महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी आणि जनजागृती संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते आणि अजूनही केले जात आहे. आतापर्यंत महाविद्यालयात नवमतदार नोंदणी अभियान, अभिरूप मतदान कार्यक्रम, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धा, मतदार जनजागृतीपर कार्यशाळाइ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमात सप्टेंबर, २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. श्रीकांत देशपांडे यांच्या जिल्हा दौऱ्यानिमित्त आयोजित ‘सामर्थ्य मताचे : युवा मतदारांशी एक विधायक सुसंवाद….’ हा परिसंवादपर कार्यक्रम विशेष उल्लेखनीय आणि कौतुकास्पद ठरला.
रत्नागिरी जिल्ह्यात अधिकाधिक संख्येने मतदार नोंदणी आणि त्या संदर्भात जनजागृती कशी करता येईल, या संदर्भात स्वीप (Systematic Voters Education and Electoral Participation) उपक्रमांतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यशास्त्र विभागातील प्रा. निलेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला होता. महाविद्यालयात राबविले जाणारे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयात राबविण्यासाठीचा प्रारूप आराखडा जिल्हा परिषद शिक्षण विभागास सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनात तत्कालीन जिल्हाधिकारीआणि महाविद्यालयातील प्राचार्य, प्रशासकीय उपप्राचार्ययांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रबंधक श्री. रवींद्र केतकर,तिन्ही शाखांचे उपप्राचार्य,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीयांचे सहकार्य लाभले होते.
गतवर्षी भारत शिक्षण मंडळाच्या देव- कीर- घैसास महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात राज्यशास्त्र विभागातील प्रा. निलेश पाटील यांचा मतदार नोंदणी, जनजागृती कार्यक्रम महाविद्यालयात उत्तमरीत्या राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. एम. डी. सिंह यांच्याहस्ते ‘उत्कृष्ट मतदारमित्र पुरस्कार-२०२३’ देऊन गौरव करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून फिनोलेक्स महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये मताधिकार, लोकशाही या संबंधीकेलेली जागृती आणि त्यासाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल हा पुरस्कार महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाची युवा ब्रांडअम्बेसेडर कु. मनस्वी नाटेकर हिने हा पुरस्कार महाविद्यालयाच्या वतीने स्वीकारला.
महाविद्यालयाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, ‘नवमतदार नोंदणी आणि मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग गेली अनेक वर्षे जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर उत्तम कार्यकरीत आहे. राज्यशास्त्र विभागाने आतापर्यंत जे उत्तम कार्य केले आहे, त्याची फलश्रुती म्हणजे महाविद्यालयाला मिळालेला हा पुरस्कार आहे. भविष्यात आपण निश्चितच अधिकाधिक चांगले काम करून या राष्ट्रीय कार्यास हातभार लावू, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
सदर पुरस्कार महाविद्यालयाला मिळाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी प्रा. निलेश पाटील आणि राज्यशास्त्र विभागाचे विशेष अभिनंदन केले आहे.