भरगच्च निसर्गसौंदर्य जैवविविधता आणि पर्यायाने पर्यटन लाभलेला महाराष्ट्राचा एक भाग म्हणजे कोकण. कोकणाला लांबलचक असा सागरी किनारा देखील लाभला आहे. यामुळे कोकणात मासेमारी हा व्यवसाय प्रामुख्याने चालतो. मासेमारी हे येथील लोकांच्या उपजीविकेचे एक प्रमुख साधन आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्राच्या अभ्यासक्रमात मत्स्य जीवशास्त्र हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. मत्स्य जीवशास्त्राचा अभ्यास करताना विद्यार्थी प्रत्येक वर्षी विविध प्रकल्प करतात तसेच आसपासच्या भागातील मत्स्य प्रक्रिया आणि उत्पादने करणाऱ्या विविध औद्योगिक संस्थांना भेटी देतात.
या विषयाचे शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांनी त्याकडे एका परिपूर्ण व्यवसायाच्या दृष्टीकोनातून पहावे या हेतूने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाने मत्स्यमहाविद्यालय शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 मार्च2019 ते 9 मार्च 2019 या कालावधीत “मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ” बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मधुरा मुकादम यांनी या कार्यशाळेची संकल्पना विद्यार्थ्यांना सांगितली आणि मत्स्य महाविद्यालयातील उपस्थित असणाऱ्या प्राध्यापकांचे स्वागत केले.
डॉ. साईप्रसाद सावंत यांनी माशांचे मानवी आहारातील महत्व व त्यांच्यामध्ये आढळणारी पोषक मूल्य उदा. प्रथिने, ओमेगा वर्गीय स्निग्धाम्ले इ. माहिती आपल्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना दिली. डॉ. सुरेंद्र पतंगे यांनी मत्स्य उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया त्यासाठी वापरली जाणारी उपकरणे व विविध आवेष्टन पद्धती यांची माहिती दिली. डॉ. श्रीकांत शारंगधर यांनी माशांपासून विविध खमंग खाद्यपदार्थ उदा. जवळा चटणी, वडे ,कटलेट, शेव, लोणचे कसे बनवितात याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आपल्या प्रात्यक्षिकाद्वारे केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना हे सर्व पदार्थ बनवण्याची संधी देण्यात आली. महाविद्यालयातील विविध विभागाच्या प्राध्यापकांनीया कार्यशाळेत विद्यार्थ्यांद्वारे बनविण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
या कार्यशाळेमध्ये जीवशास्त्र विभागातील 35 विद्यार्थी सहभागी झाले होते. मत्स्य प्रक्रिया आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि प्रशस्तिपत्रके तसेच मत्स्य पाककला पुस्तिका यांचे वितरण केले. या कार्यशाळेचे नियोजन जीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका अतिका राजवाडकर यांनी केले होते.
सदर कार्यशाळेसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राणिशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.