गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप-२०२२’ या सांस्कृतिक युवा महोत्सवाची सांगता दिलखेचक अशा‘डान्सशो’ने झाली. या संपूर्ण सांस्कृतिक युवा महोत्सवादरम्यान उत्कृष्ट कार्यक्रम व्यवस्थापनासाठी दिला जाणारा तसेच मानाचा समजला जाणारा ‘महाराजा करंडक’ यावर्षी ऑल बीए या वर्गाने पटकावला. महाराजा करंडकचे यंदाचे १९वे वर्ष होते. क्लास चाम्पियन्शीप चे विजेते पद बीएमएस-अकौंटं फायनान्स यांनी प्राप्त केले, टीवायबी कॉम व टीवायबीए वर्गाने द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कोकणातील एक नामवंत महाविद्यालय म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात महाविद्यालयाचे एक आगळे-वेगळे स्थान आहे. त्या लौकिकाला साजेशा झेप सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. या सांस्कृतिक युवा महोत्सवात नृत्य, साहित्य, कला, वाङ्मयमय, अभिनय, विज्ञान-तंत्रज्ञान अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.अनेक मराठी कलाकार, लेखक या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते. या सर्व कार्यक्रमांमध्ये महाराजा करंडकाचे एक विशेष आणि मानाचे असे स्थान आहे. विद्यार्थ्यांच्या कार्यक्रम व्यवस्थापानाची स्पर्धा घेणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे बहुधा महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. या सांस्कृतिक युवा महोत्सवात उत्कृष्ट कार्यक्रम व्यवस्थापन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघाला १९९५ यावर्षीच्या माजी विद्यार्थ्यांनी पुरस्कृत केलेला महाराजा करंडक देण्यात येतो.
झेप या सांस्कृतिक युवा महोत्सवातील समारोपाचा कार्यक्रम म्हणजे खातू नाट्य मंदिर येथे पार पडलेला ‘डान्स शो’ होय. ऑल बीए या वर्गाने सदर कार्यक्रमाचे अत्यंत उत्कृष्ट आयोजन आणि व्यस्थापन करून महाराजा करंडकावर आपले नाव कोरले. व्यवस्थापन स्पर्धेतील द्वितीय क्रमांक ऑल बी एससी या वर्गाने तर तृतीय क्रमांक बीएमएस या वर्गाने पटकवला.
याप्रसंगी महाविद्यालयातील विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावर्षी उत्कृष्ट सूत्रसंचालनाचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे शुभम बंडबे , तुषार यादव आणि स्नेहल कोकणी यांनी पटकावले. वैयक्तिक व जोडी नृत्य स्पर्धेत अनुजा जोशी, देवेश बोरकर, सानिका शेट्ये यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला तर जोडी नृत्य स्पर्धेत अनुजा जोशी – आस्था खेडकर ,आकांक्षा भोंगले – साक्षी खलपे, वृषाली सावंत, उमा शहाणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. महाविद्यालयातील कर्मचारी श्री. प्रसाद तथा बापू गवाणकर यांचा ३२ वर्षे अविरत सेवेबद्दल संस्थेचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला र. ए. सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, झेप समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, माजी विद्यार्थी आणि महाराजा करंडक प्रायोजक श्री. बिपीन शिवलकर, सौ. राजश्री शिवलकर, विद्यार्थी प्रतिनिधी यश सुर्वे इतर मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन तरुणाई बहुसंख्येने उपस्थित होती.