गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा झेप हा सांस्कृतिक महोत्सव तरुणाईच्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. या महोत्सवात सांस्कृतिक कला गुणांबरोबरच महाविद्यालयातील शैक्षणिक आणि सहशैक्षणिक विभागांच्यावतीने विविध विषयांना स्पर्श करणारे आणि त्याविषयातील ज्ञान उलगडून दाखविणाऱ्या माहितीपर प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. या सर्व प्रदर्शनांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यमान वर्षी झेप महोत्सवात महाविद्यालयातील माहितीतंत्रज्ञान विभागाच्यावतीने माहितीतंत्रज्ञानाचे दैनंदिन जीवनातील उपयोजन याविषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे विविध कलाप्रकारांचे दर्शन घडविणारी अनेक कलाप्रदर्शने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणप्रश्न, सामाजिकप्रश्न, भारतीयस्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवीवर्ष अशा विविध संकल्पना समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी रांगोळी, ऑन द स्पॉट पेंटिंग, फोटोग्राफी,फोटोएडिटिंग, मेहंदी, मंडलाआर्ट अशा कलेतून आपले कौशल्य दाखवून दिले. विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘आज़ादी का अमृतमहोत्सव’ ही विशेष थीम घेउन साकारलेले रांगोळी प्रदर्शन हे झेप महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालायातर्फे स्पर्धा परीक्षा आणि व्यवसाय मार्गदर्शन या विषयावरील ‘अंधाराकडून प्रकाशाकडे’ अशी थीम घेऊन ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
आधुनिक डिजिटल युगात माहितीतंत्रज्ञानावर आधारित लॅनगेमिंग, गेमहाऊस, फनीगेम्सचेही आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी थाटलेल्या फूडस्टॉलवरही अनेक नाविन्यपूर्ण आणि लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तुंनीही उपस्थितांची मने जिंकली. ही सर्व प्रदर्शने युवावर्गाची मने जिंकणारी आणि मान्यवरांची शाबासकी मिळवून देणारी प्रमुख आकर्षणे ठरली.
महाविद्यालयातील फिल्म क्लबच्यावतीने सिनेमावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा, वादविवाद आणि वक्तृत्व समितीच्यावतीने वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा, समूहचर्चा, कुकिंग स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रदर्शनांना र.ए.सोसायटीचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. या संपूर्ण उपक्रमांच्या नियोजनासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन तर आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर, प्रशासकीय उपप्राचार्य, तिन्ही शाखेच्या उपप्राचार्या, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभले.