महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सकारात्मक गुणांना व सृजनात्मक कल्पनांना अधिक संधी देऊन भविष्यातील करिअरसाठी आत्मविश्वास निर्माण करणारे अनेक उपक्रम गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप वार्षिक महोत्सवातून निर्माण होत असते. वनस्पतिशास्त्र व प्राणीशास्त्र विभागांनी मांडलेले अनोखे प्रदर्शन लक्षणीय असे ठरले.
या वैशिष्ट्यपूर्ण आणि सृजनात्मक प्रदर्शनातून अनोख्या प्रतिकृतींची उभारणी करण्यात आली होती. वनस्पतीशास्त्र विभागातील प्रदर्शनात वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींची झलक या मुख्य विषयान्वये जगातील सर्वात मोठे फुल, धबधबा , बुरशीचे विविध प्रकार , विविध झाडे यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. प्राणीशास्त्र विभागाने विस्मयकारी गमती जमती या मुख्य विषयांतर्गत मानवी शरीरातील विविध अवयवांचे प्रदर्शन, जन्मापासून मृत्यू पर्यंत मानवी जीवनाचे विविध टप्पे, राष्ट्रीय उद्याने अशा अनेकविध प्रतिकृती उभारल्या होत्या. विद्यार्थी व निमंत्रितानी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शने यशस्वी केली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचे हस्ते झाले. सोबत श्री. महेश मिल्के,श्री. नितीन मिरकर,श्री. मिलिंद मिरकर ,श्री. बिपीन बंदरकर,हे निमंत्रित माजी विद्यार्थी,तिनही शाखांच्या उप प्राचार्या,प्राध्यापक वर्ग व विज्ञान प्रेमी विद्यार्थी उपस्थित होते. तृतीय वर्षीच्या प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थांनी व प्राध्यापकांनी सदर प्रदर्शन यशस्वी करण्यात सहकार्य केले.