गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे कौशल्यविकास व स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत ‘फळप्रक्रिया व ते टिकवण्याचे तंत्रज्ञान’ या विषयावर नुकतेच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी कोकणच्या दृष्टीने या कार्यशाळेची उपयुक्तता विषद केली. तसेच या कार्यशाळेत फळप्रक्रिया तंत्रज्ञान शिकल्यानंतर उन्हाळी सुट्टीत असे पदार्थ तयार करण्याचे कौशल्य प्राप्त करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
या कार्यशाळेदरम्यान डॉ. मंगल पटवर्धन यांचे फळ प्रक्रिया तंत्रज्ञान कां? आणि कसे? या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी पारंपारिक फळप्रक्रिया आणि त्यासंबंधीचे आधुनिक तंत्रज्ञान आपल्या व्याख्यानात विषद केले. तसेच व्यवसायाच्या दृष्टीने पदार्थांचे पाकिंग व विक्री, त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या या संदर्भात वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी आणि व्यावसायिक श्री. ज्ञानेश पोतकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेत त्यांनी कोकणातील या हंगामातील आंबा, कोकम, जांभूळ आणि करवंद या फळांपासून जॅम, स्क्वॅश, सरबत, लोणची, मुरांबा असे ११ विविध प्रकारचे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.