प्रतिवर्षाप्रमाणे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमधील सर्व घटक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी ‘१ लाख सूर्यनमस्कार’ घालून रथसप्तमीचा दिवस साजरा केला. या उपक्रमाचा प्रारंभ सकाळी ७.३० वाजता विविध घटक संस्थांमध्ये झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर उपस्थित होते. रत्नागिरीतील सूर्यनमस्कार तज्ज्ञ श्री. विश्वनाथ बापट यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संस्थातील ७००० विद्यार्थ्यांनी १ लाख सूर्यनमस्कार घातले. या उपक्रमात गोगटे जोगळेकर महाविद्यालय, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालय, रा. भा. शिर्के प्रशाला, गोदुताई जांभेकर विद्यालय, गोडबोले विद्यालय, केळ्ये, तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालय, अॅड. नानल गुरुकुल, कै. बाबुराव जोशी गुरुकुल, मालतीबाई जोशी प्राथमिक शाळा, ल. ग. पटवर्धन प्राथमिक शाळा, स्वामी स्वरूपानंद प्राथमिक शाळा इ. सर्व घटक संस्थांतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला.