संमेलनाचे उद्घाटन अगदी वेळेत सकाळी 10:30 वाजता सुरू झाले. व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक श्री. दा. कृ. सोमण, र. ए. सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कुलकर्णी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य डॉ. सुखटणकर सर ज्यांनी महविद्यालयात खगोल केंद्राची स्थापना केली ते ही आवर्जून उपस्थित होते .
या संमेलनात सहभागी होणारे मान्यवर वक्ते तसेच अमरावती ,परभणी इतक्या लांबून आलेले हौशी खगोल अभ्यासक उपस्थित होते.
राज्य खगोल अभ्यासक मंडळाचे श्रीनिवास औंधकर, सचिन मालेगावकर, श्री सुधीर फाकटकर, श्री. नंदकुमार कासार हे मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाबद्दल मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा देऊन आलेल्या सर्व वक्त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानले. श्री. दा. कृ. सोमण यांनी आपल्या बीजभाषणात लो. टिळकांचे खगोल – गणितातील योगदान या विषयावर बोलताना पंचांग तयार करण्यासाठी आधारभूत असणाऱ्या करणग्रंथांची ओळख करून दिली. लो. टिळकांच्या म्हणण्यानुसार सर्व पंचांगे ही दृक गणितावर आधारित म्हणजेच जे आकाशात दिसते तेच पंचांगात असावे किंवा पंचांग हे आकाशाचे अचूक वेळापत्रक असावे.. असा ठराव 1920 साली संमत करून घेतला होता . तो आपण त्यानंतर 30 वर्षांनी अमलात आणला असे श्री सोमण यांनी सांगितले .पंचांग शुध्दी या दृष्टीने लो. टिळकांचे खगोलातील योगदान अतिशय दूरदर्शी आणि महत्त्वाचे आहे असे म्हणून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी संमेलनाची स्मरणिका आणि श्री. सोमण लिखित ‘पुढील पाच वर्षांचे आकाश’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक श्री. सोमण यांनी नुकतेच फेब्रुवारी महिन्यात आपल्या आजारपणात या संमेलनासाठी लिहिले आहे. यानंतर श्रीमती. शिल्पताई पटवर्धन यांनी अतिशय भावपूर्ण असा अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजश्री भावे यांनी केले तर प्रस्तावना प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. निशा केळकर यांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर आयुका येथील डॉ. समीर धुरडे यांनी चंद्राचे वेड आणि वेध तर तुषार पुरोहित यांनी टेलिस्कोप मेकींग यावर सुंदर व्याख्याने दिली. हेमंत मोने यांनी ओघवत्या शैलीत तारकांची अंतरे या विषयी व्याख्यान दिले.