gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला “२०२३ स्टार कॅम्पस अवॉर्ड्स’’ प्रदान ;स्टार कॅम्पस अवॉर्ड्स मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला “२०२३ स्टार कॅम्पस अवॉर्ड्स’’ प्रदान

अर्थ डे नेटवर्क इंडिया या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा “२०२३ स्टार कॅम्पस अवॉर्ड्स” गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला नुकताच प्रदान करण्यात आला. हे पारितोषिक मिळविणारे गोगटे – जोगळेकर महाविद्यालय हे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.

अर्थ डे ऑर्गनायझेशन ही विश्वव्यापी संस्था पर्यावरण संवर्धन क्षेत्रात १९७० पासून कार्यरत असून, जगभरात १९० पेक्षा जास्त देशांमधील पन्नास हजारपेक्षा अधिक संस्थांसोबत काम करीत आहे. शैक्षणिक संस्थांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती आणि साक्षरता समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे ध्येय आहे. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक संकुले आणि महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांना देशपातळीवर प्रसिद्धी देण्यात येते. या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि शैक्षणिक संकुले शाश्वत, पर्यावरणपूरक आणि हरित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी STAR CAMPUS AWARDS अर्थात तारांकित परिसर पारितोषिक ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय परिसर तसेच महाविद्यालयाने समाजामध्ये राबविलेले पर्यावरणपूरक कार्यक्रमांची जसे ऊर्जा बचत, पाण्याचे योग्य नियोजन – पावसाळी पाणी साठवण, रासायनिक आणि जीवशास्त्रीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट, परिसरातील हिरवळ आणि सामाजिक बांधिलकी जपत दत्तक गावांमध्ये पर्यावरण पूरक राबविण्यात आलेल्या उपक्रमांची नोंद अर्थ डे संस्थेकडून घेतली गेली.पर्यावरणीय संरक्षण आणि शाश्वत विकासाबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महाविद्यालयाने इतर शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थ डे संस्थेचे श्री.विनायक साळुंखे यांनी केले. आपल्या मनोगतातून त्यांनी अर्थ डे संस्था, तिचे पर्यावरण क्षेत्रातील कार्य, हे पारितोषिक देण्यामागील उद्देश आणि संकल्पना याविषयी उपस्थितांना माहिती दिली. ऊर्जा बचत, पाण्याचे योग्य नियोजन, कचऱ्याची विल्हेवाट, परिसरातील हिरवळ आणि सामाजिक बांधिलकी या पाच श्रेणींसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने राबविलेले पर्यावरणपूरक उपक्रम आणि शाश्वत विकासासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे सांगून महाविद्यालयाने केलेल्या कार्याची दखल घेऊन महाविद्यालयाला हे पारितोषिक देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झालेला “२०२३ स्टार कॅम्पस अवॉर्ड्स” हा महाविद्यालय आणि संस्थेसाठी फार मोठा बहुमान असल्याचे सांगितले. या पुरस्कारामुळे महाविद्यालयाचे यश, प्रगतीमध्ये आणखी भर पडली असून, भविष्यात महाविद्यालय अशीच प्रगतीची शिखरे पादाक्रांत करीत राहील, असा विश्वास व्यक्त केला.

र. ए. संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाला हे पारितोषिक मिळाल्यामुळे र.ए. संस्था आणि महाविद्यालयाच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. समकाळात विविध पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले असून, त्याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. वाणिज्य आणि उद्योगांच्या अनुषंगाने प्लास्टिकबंदी करण्याऐवजी त्याच्या पुनर्नवीकरणातून विविध प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम राबविता येऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, जगात पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदल या गंभीर समस्या असताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयासारखी शैक्षणिक संस्था या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्रिय उपाययोजना करीत आहेत, हे आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.शाश्वत विकास आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी महाविद्यालय करीत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक करून भविष्यात रत्नागिरी शहराचे पर्यावरण चांगले राखण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.हा पुरस्कार महाविद्यालयाला मिळाल्याबद्दल त्यांनी प्र. प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन आणि कौतुक केले.

सदर पारितोषिकासाठीचा प्रस्ताव प्रा. डॉ. सोनाली कदम यांनी तयार केला होता. याबाबत त्यांना विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रा. डॉ. मधुरा मुकादम यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी व्यासपीठावर र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, अर्थ डे संस्थेचे श्री. विनायक साळुंखे, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. सोनाली कदम यांनी केले. हे पारितोषिक प्रदान सोहळ्याप्रसंगी तिन्ही शाखेच्या उपप्राचार्या, विविध विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.