अर्थ डे नेटवर्क इंडिया च्या वतीने, “2023 स्टार कॅम्पस अवॉर्ड्स” च्या ग्रीनरी आणि इन्फ्रास्ट्रक्चर या श्रेणी मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विजेती म्हणून निवड झाली आहे.ऊर्जा बचत, पाण्याचे योग्य नियोजन,कचऱ्याची विल्हेवाट, परिसरातील हिरवळ आणि सामाजिक बांधिलकी या पाच श्रेणींसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे समर्पण आणि पर्यावरणीय टिकावासाठी केलेल्या कठोर परिश्रमाची दखल घेऊन महाविद्यालयाला हे पारितोषिक प्राप्त झाले आहे.अर्थ डे ऑर्गनायझेशन ही विश्वव्यापी संस्था जगभरात 190 पेक्षा जास्त देशांमधे पन्नास हजार पेक्षा जास्त संस्थांसोबत पर्यावरण संवर्धन क्षेत्रात 1970 पासून कार्यरत आहे. शैक्षणिक संस्थांना त्यांच्या अभ्यासक्रमात हवामान साक्षरता समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे ध्येय आहे.या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलामध्ये आणि महाविद्यालयांमध्ये नियमितपणे करीत असलेल्या पर्यावरण पूरक उपक्रमांना विविध माध्यमातून देशपातळीवर मांडण्यात येते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झालेला “2023 स्टार कॅम्पस अवॉर्ड्स” हा पुरस्कार गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने कॅम्पसमध्ये अवलंबलेल्या उत्कृष्ट पर्यावरणीय पद्धतींना मान्यता देतो.अर्थ डे नेटवर्क इंडिया या देशव्यापी बिगर सरकारी पर्यावरणीय संस्थे मार्फत महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि शैक्षणिक संकुले शाश्वत, पर्यावरणपूरक आणि हरित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थ डे नेटवर्क यांच्या माध्यमातून STAR CAMPUS AWARDS अर्थात तारांकित परिसर पारितोषिक ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत महाविद्यालयातील परिसरामध्ये आणि महाविद्यालय मार्फत समाजामध्ये पर्यावरण पूरक राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची जसे ऊर्जा बचत, पाण्याचे योग्य नियोजन – पावसाळी पाणी साठवण, रासायनिक आणि जीव शास्त्रीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट, परिसरातील हिरवळ आणि सामाजिक बांधिलकी जपत दत्तक गावांमध्ये पर्यावरण पूरक राबविण्यात आलेल्या उपक्रमांची नोंद घेतली गेली.
पर्यावरणीय कारभाराबाबत महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण आणि सक्रिय दृष्टिकोनाने निःसंशयपणे महाविद्यालयाने इतरांसाठी एक बेंचमार्क सेट केला आहे.
तसेच जगात पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदल या गंभीर समस्या असताना गोगटे जोगळेकर महाविद्यालय सारखी शैक्षणिक संस्था या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्रिय उपाययोजना करत आहेत , शाश्वत पद्धतींचा अवलंब करून, पर्यावरणीय निरोगी वातावरणासाठी चे योगदान आणि तरुण पिढीला सकारात्मक कृती करण्यास प्रेरित करत असण्या बाबत अर्थ डे नेटवर्क इंडियाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.सदर पारितोषिकासाठी चा प्रस्ताव डॉ. सोनाली कदम यांनी तयार केला. त्यांना विज्ञान शाखेच्या उप प्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा मा. शिल्पाताई पटवर्धन आणि सचिव श्री. सतीश शेवडे यांनी महाविद्यालयाला लाभलेल्या पारितोषिक बाबत प्राचार्य पी.पी. कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय उप प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे.