भारतीय राज्यघटनेने आपल्या आदर्श नियमावलीत महिला विषयक नियमांना महत्वपूर्ण स्थान देऊन महिला उन्नतीसाठी अनेक कायद्यांची निर्मिती केली आहे. या सर्व कायद्यांची ओळख करून घेतल्याने महिलांचे जीवन सुखी व संपन्न होण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला स्थेर्य लाभणार आहे त्यामुळे महिलांनी आपल्या संदर्भात करण्यात आलेले कायदे, त्यातील तरतुदी डोळसपणे लक्षात घ्याव्यात असे आवाहन जिल्हा महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. विनया घाग यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाअंतर्गत आयोजित ‘महिला आणि कायदे’ या विषयावरील व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या.
सर्वसामान्य महिलांना महिला विषयक कायद्यांच्या अनुषंगाने सज्ञान बनविण्याची जबाबदारी महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनीवर येते त्यामुळे विद्यर्थ्यांनी आपल्याकडे असलेले कायद्याचे ज्ञान आपल्या भागातील महिला वर्गापर्यंत नेऊन पोहोचविल्यास संपूर्ण समाज महिला कायद्यांच्या अनुषंगाने साक्षर होणे शक्य होणार आहे. महाविद्यालयात अॅड. विनया घाग आणि अॅड.. भाग्यश्री सामंत यांनी विद्यार्थ्यांना महिलासंदर्भातील विविध कायद्यांची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महिलासंदर्भातील कायद्यांची माहिती लोकांना नसल्यामुळे विविध प्रकरच्या अन्याय आत्याचारास सामोरे जावे लागते. अन्य होण्यापूर्वी त्याला प्रतिबंध करणे महत्वाचे आहे. यासाठी कायदे संदर्भातील ज्ञान महिलांना सक्षम बनविणारे ठरेल. विद्यार्थ्यांनी या कायद्याची माहिती घेऊन लोकांपर्यंत सदर माहिती पोहोचविण्यात महत्वाची भूमिका घेतली पाहिजे. अॅड. विनया घाग यांनी प्रासंगिक उदाहरणांसह विद्यार्थ्यांना वैयक्तिक कायदे, स्वाधार केंद्र, महिला विषयक कायदे, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत घ्यावयाची काळजी याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.
सद्य कालखंडातील ऑनलाइन क्षेत्रातील महिलांसंदर्भात वाढलेल्या गुन्ह्यांची संख्या आणि महिलांच्या समस्या लक्षात घेता त्या अनुषंगाने समाजात जाग्रुतता निर्माण करण्यात विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची ठरेल असे मत अॅड. विनया घाग यांनी व्यक्त केले. याच कार्यक्रमात विद्यार्थांशी संवाद साधताना अॅड. भाग्यश्री सामंत यांनी बालक लैंगिक छळ कायद्यासंदर्भातील माहिती दिली. आपल्या आजूबाजूला बालकांसदर्भात घडणाऱ्या विविध अपराधांची संख्याही लक्षात घेण्यासारखी आहे. शून्य ते अठरा वयोगटातील बालकांच्या संदर्भातील गुन्हे व त्या संबंधी कायदे, पोस्को कायदा, महिलांसाठी विविध कायदे, जिल्हा महिला सहायता समिती याचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. महिलांना सक्षम होताना कायद्याची साथ अत्यंत आवश्यक आहे असे ठाम मत अॅड. भाग्यश्री सामंत यांनी मांडले.
‘विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनाचा भाग असलेल्या विषयांवर तज्ज्ञ आणि जाणकारांकडून दिले जाणारे ज्ञान विद्यार्थ्यांना अधिक प्रेरित करणारे ठरते, अशा उपक्रमांसाठी विभाग कायम सक्रीय आहे आणि राहिल’ असे मत समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. तुलशीदास रोकडे यांनी मांडले. विभागाच्या या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केलेले साहाय्य अधिक प्रेरणादायी ठरले. उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी कार्यक्रम नियोजनात साहाय्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजी उकरंडे यांनी केले. कार्यक्रम नियोजनात प्रा. आनंद आंबेकर, प्रा. सचिन सनगरे, प्रा. निलेश पाटील याचे सहकार्य लाभले.
प्रथम वर्षापासून ते पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. वक्त्यांसोबत झालेल्या मुक्त संवादामुळे आम्हाला महिलांसंदर्भातील कायद्यांची अधिक माहिती झाली अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली.