gogate-college-autonomous-updated-logo

नागरिकांना हक्कांबरोबरच कर्तव्यांची जाणीव असणे आवश्यक-ॲड. डॉ. आशिष बर्वे

ॲड. डॉ. आशिष बर्वे

भारतीय संविधान लागू झाल्यापासून देशकाल-परिस्थितीनुसार संविधानाची वाटचाल सुरु आहे. नागरिकांना आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांची जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ॲड. डॉ. आशिष बर्वे यांनी येथे केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने संविधान दिनानिमित्त ‘ओळख संविधानाची’या विषयावर र. ए. सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ॲड. डॉ. आशिष बर्वे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजी उकरंडे यांनी केले. त्यानंतर राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले.

उपस्थितांसमोर आपले विचार प्रकट करताना ॲड. डॉ. बर्वे पुढे म्हणाले की, भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे संविधान असून, संविधानामुळे भारतीय लोकशाही आजपर्यंत टिकून आहे. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असून, ते एक जिवंत दस्तावेज आहे. नागरिकांच्या जीवनात संविधानाने मूलगामी बदल घडवून आणले आहेत. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याचे आणि न्यायालयांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे कार्य संविधानाने केले आहे. नागरिकांनी आपली मूलभूत कर्तव्ये जाणून घेऊन त्यांचे पालन केल्यास स्वत: बरोबरच देशाचीही प्रगती होऊ शकते. असेते पुढे म्हणाले. आपल्या मनोगतातून त्यांनी संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये, संविधानाचे योगदान यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी म्हणाले, संविधान नागरिकांशी सबंधित महत्वाचा दस्ताऐवज असून, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण संविधान, लोकशाही मूल्यांचे जतन केले पाहिजे. संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले असून, आपण त्याचा योग्य रीतीने वापर केला पाहिजे. तसेच नागरिकांना त्वरित न्याय मिळायला पाहिजे. न्याय मिळण्यास विलंब होणे म्हणजे अन्याय करण्यासारखे आहे, असेही ते पुढे म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, अभ्यंकर–कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, समारंभ समितीचे प्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मेघना म्हादयेयांनी, तर आभारप्रदर्शन प्रा. मधुरा चव्हाण यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता समारंभ समिती सदस्य, कार्यालयीन कर्मचारी, सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या व्याख्यानाकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.