gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. मकरंद साखळकर यांची नियुक्ती

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. मकरंद साखळकर यांची नियुक्ती

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. मकरंद साखळकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री.सतीशजी शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर आणि संस्थेचे अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला.

डॉ. मकरंद साखळकर हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून सन १९९५ मध्ये महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात व्याख्याता म्हणून ते रुजू झाले. तत्पूर्वी त्यांनी अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापन केले आहे. ते वाणिज्य विभागात प्राध्यापक आणि अकाउंटन्सी विषयाचे विभागप्रमुख म्हणूनकार्यरत होते. त्यांनीमुंबई विद्यापीठातून वाणिज्य आणि विधी शाखेची पदवी प्राप्त केली असून, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून विद्यावाचस्पती पदवी संपादन केली आहे. याशिवाय Institute of Cost Accountants of India, कोलकाता येथून त्यांनी ACMA चे शिक्षण पूर्ण केले आहे.

डॉ. साखळकर यांना पदवी स्तरावरील २८ वर्षे तर पदव्युत्तर स्तरावर १९ वर्षे अध्यापनाचा अनुभव असून, अध्यापकीय कारकिर्दीबरोबरच त्यांनी विविध प्रशासकीय जबाबदाऱ्याही यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. अकाउंटन्सी विभागाचे विभागप्रमुख, वाणिज्य शाखा उपप्राचार्य, प्रशासकीय उपप्राचार्य, व्यवस्थापन पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाचे समन्वयक, वित्त अधिकारी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष, संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक अधिकारी आदिसह महाविद्यालयाच्या विविध समित्यांमध्येही त्यांनी समन्वयक, सदस्य म्हणून काम केले आहे. एम. फिल. आणि विद्यावाचस्पती पदवीसाठी मुंबई विद्यापीठात संशोधक मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांनी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली असून, सध्या दोन विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रबंध विद्यापीठाला सादर केले आहेत. त्यांचे विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये ३० शोधनिबंध, तर दोन पुस्तके प्रकाशित झाले आहेत. सुमारे ११ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते सहभागी झाले असून, मुंबईविद्यापीठाचे ३ लघु संशोधन प्रकल्प त्यांच्या नावावर आहे. Institute ofCost Accountants of India चे सहयोगी अध्यक्ष, Indian Accounting Associationचे आजीव सभासद अशा विविध आस्थापनांवरही ते कार्यरत आहेत. र. ए. सोसायटीच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. बाबुराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

पदभार स्विकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना प्राचार्य डॉ. साखळकर म्हणाले, र. ए. शिक्षण संस्था आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय ही कोकणातील एक अग्रगण्य शिक्षणसंस्था आहे. गतवर्षी महाविद्यालयाला मिळालेला स्वायत्ततेचा दर्जा, अशातच स्वायत्त महाविद्यालयांमध्ये लागू झालेले नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान पेलत असताना सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यातून संस्था आणि महाविद्यालयाचा सर्वागीण विकास साधणे यावर लक्ष केंद्रित करून महाविद्यालयाचा नावलौकिक आणखी कसा वाढेल, यावरआपण भर देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या या नियुक्तीबाबत र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, संस्थेचे पदाधिकारी, माजी प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, सर्वशिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीयांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.