महाविद्यालयीन जीवनातील अभ्यासेतर उपक्रमामधील एक महत्वाचा आणि सर्वाधिक संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना ! गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे विद्यमान शैक्षणिक वर्षाच्या राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाचे उद्घाटन आणि उद्बोधन दिनांक २२ सप्टेंबर रोजी करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे गीत गाऊन उद्बोधन वर्गाचा आरंभ करण्यात आला. माजी विद्यार्थी आकाश मणचेकर आणि स्वरूप भाटकर यांनी आपले अनुभव कथन केले.
राष्ट्रीय सेवा योजनेची ध्येये आणि उद्दिष्टे सांगताना आकाश मंचेकर यांनी नेतृत्व विकसन आणि स्वयंशिस्त या दोन घटकांवर विशेष भर दिला. या उपक्रमाचा स्वयंसेवक म्हणजे फक्त १२० तास भरून काढण्यापुरताच मर्यादित नाही तर सतत २४x७ असा हा स्वयंसेवक आहे.आपण स्वत:विषयी बाळगून असलेल्या समजुती, प्रतिष्ठा बाजूला सारूनच आपल्या समाजाचं देणं फेडू शकू असे त्यांनी सांगितले. समाज बांधणी व राष्ट्र उभारणी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक व्यासपीठ आहे.“राष्ट्रीय सेवा योजना” विभागाचे बोधचिन्ह हे कोणार्कच्या सूर्यमंदिराचे चाक आहे म्हणजेच ते रथचक्र आहे.चक्र म्हणजे सतत गतिशीलता. आपले स्वयंसेवक हेसुद्धा सतत गतिशील राहून स्वतःचा आणि त्यायोगे समाजाचा विकास घडवून आणू शकतात. या बोधचिन्हात वापरलेले रंग लाल, निळा व पांढरा यांचेही महत्त्व त्यांनी सांगितले. लाल रंग हे तरूणांच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताचे तर निळा रंग हे विशाल आकाशाचे प्रतीक आहे. आपण तयार झालो तरच समाज आपल्यासाठी तयार होईल असे मत त्यांनी मांडले स्वरूप भाटकर यानी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील शिबिराचे महत्व आणि व्यक्तिमत्व विकास व सामाजिक कार्याचे महत्व सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी स्वयंसेवकांच्या अंगी असणारी प्रचंड उर्जा योग्य कामी लागली पाहिजे. नेतृत्व गुण अंगी बनवण्यासाठी “राष्ट्रीय सेवा योजना” उपक्रम हे एक उत्तम कार्यक्षेत्र ठरू शकेल असे त्यांनी सांगितले. स्वतःला ओळखा, स्वतःच्या मर्यादा, शक्ती, संधी ओळखा आणि कामाला सुरुवात करा तरच अपेक्षित शिखर गाठता येईल असेही त्यांनी सांगितले. स्वयंसेवकांनी काळजीपूर्वक कार्य करणे आवश्यक आहे, कामाचे नियोजन हे असलेच पाहिजे आणि याचा परिणाम म्हणून आपल्या महाविद्यालयास अनेक वेळा विद्यापीठ पातळीवर सन्मानित केले गेले आहे. स्वयंसेवक म्हणून आपली भूमिका ओळखून कार्य केले गेले पाहिजे असे मत मांडले. विद्यार्थी दशेपासून ते प्राचार्य होण्यापर्यंतच्या अनेक कामात राष्ट्रीय सेवा योजना मधील कार्याचा अनुभव आपल्याला फायदेशीर ठरल्याचे मत त्यांनी मांडले. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्राचीन व पारंपारिक ज्ञानाचे पुनरुज्जीवनाचे उद्दिष्ट राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून पूर्ण करता येईल. आपण सदोदित चांगले वर्तन टिकवून ठेवले पाहिजे, आत्मविश्वास, कार्यतत्परता, कष्ट यांतूनच संधी निर्माण होते. स्वतः चे ध्येय निश्चित करून स्वयंसेवकांनी व्यावसाईक कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत. सामुहिक स्वरूपाच्या कामातून आपण यशस्वी होऊ शकतो.
राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत घेतल्या गेलेल्या घोषवाक्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. स्वच्छता हि सेवा या उपक्रम अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण उपक्रम , स्वच्छता, देशभक्ती या विषयावर काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आली. श्रेयस रसाळ, गायत्री नाटेकर, मालवी होरंबे, सायली बारगुडे, ओंकार आठवले यांनी यात सहभाग घेतला. प्रा. उमा जोशी, प्रा. सचिन सनगरे यांनी देखील काव्य वाचन केले.
उद्बोधन वर्गाच्या प्रास्ताविकात प्रा. सचिन सनगरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमातील आजी -माजी स्वयंसेवक म्हणजे एक कुटुंबच असून या उपक्रमामुळे परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागते आणि ऋणानुबंधाची भावना जतन व संवर्धन होते असे सांगितले.
या उद्बोधन वर्गाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रमुख निमंत्रित आकाश मणचेकर, स्वरूप भाटकर, प्रा. सचिन सनगरे, प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. उमा जोशी, विद्यार्थी प्रतिनिधी व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. ओंकार आठवले याने केले.