gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत ‘अभ्यासक्रम आधारित कार्यशाळा’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत 'अभ्यासक्रम आधारित कार्यशाळा' संपन्न

मुंबई विद्यापीठाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत अभ्यासक्रमावर आधारित विविध विषयांच्या प्राध्यापकांची कार्यशाळा दि. ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर २०२४ रोजी गोगटे जोगळेकर महविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे यशस्वीपणे पार पडली. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मानव्यविद्या शाखेतील प्राध्यापकांना आणि दुसऱ्या दिवशी विज्ञान शाखेतील प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले.

दि.३० सप्टेंबर रोजी मानव्य विद्याशाखेच्या कार्यशाळेचे उदघाटन मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. अनिल सिंग, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि कार्यशाळा समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि स्वायतत्तेच्या दिशेने केलेल्या वाटचालीचा मागोवा घेतला. कार्यशाळा समन्वयक प्रा. चित्रा गोस्वामी यांनी आभार मानले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ अनिल सिंग यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रासंगिकता अधोरेखित केली. मन:शक्तीचा विकास, बुद्धीचा विस्तार करत स्वतःच्या पायावर उभे राहणारे शिक्षण या धोरणातून पुढे येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सत्रानिहाय श्रेयांक वितरणाची रचना समजावून सांगितली. व्यावसायिक कौशल्ये, मूल्य शिक्षण, भारतीय ज्ञान व्यवस्थेचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिले, तर दुसऱ्या सत्रात प्राचार्य अनिल सिंग यांनी परीक्षा पद्धतीवर प्रकाश टाकला. अंतर्गत मूल्यमापन व सत्रात मूल्यमापन, प्रश्नपत्रिका, गुणविवरण यामधील बारकावे प्राध्यापकांसमोर ठेवले. तिसऱ्या सत्रात मानव्य विद्याशाखेतील एकूण १० विषयांसाठी स्वतंत्र कक्षांमध्ये व्यवस्था करण्यात आली त्याठिकाणी साधनव्यक्तींनी सहभागींना मार्गदर्शन केले

दुसऱ्या दिवशी विज्ञान शाखेतील प्राध्यापकांसाठीच्या कार्यशाळेचे उदघाटन मा. डॉ.कविता लघाटे, अधिष्ठाता वाणिज्य आणि व्यवस्थापन आणि प्राचार्य डॉ. रवींद्र भांबर्डेकर, डॉ. मकरंद साखळकर आणि कार्यशाळा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रथम सत्रामध्ये डॉ. कविता लघाटे यांनी नवीन शैक्षणिक धोरण याबद्दल प्राथमिक स्वरूपात ओळख करून दिली आणि त्याची गरज अधोरेखित केली. डॉ. रवींद्र बांबर्डेकर यांनी परीक्षा पद्धतीवर प्रकाश टाकला. नवीन शैक्षणिक धोरणात नव्याने समाविष्ट केलेले काही अभ्यासक्रम व त्यांचे मूल्यमापन यांविषयी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात डॉक्टर माधव राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवरील माहितीचा आधार घेऊन अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केलेल्या स्तंभांबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी सुकाणू समितीचे याबाबतीतील योगदान विशद केले तसेच भारतीय ज्ञान व्यवस्था आणि विज्ञान यातील अनुबंध स्पष्ट केले. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित, सूक्ष्मजीवशास्त्र, संगणक शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान अशा आठ विषयांच्या कार्यशाळेचे शेवटचे सत्र वेगवेगळ्या कक्षात पार पडले.

मानव्य विद्याशाखेच्या कार्यशाळेत रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयातील १८० प्राध्यापकांनी सहभाग घेतला; त्यांना २३ साधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले. तर विज्ञान शाखेतील १६५ प्राध्यापकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला त्यांना २० साधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले.

Comments are closed.