‘प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान’ (पीएमउषा) या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत ‘टेक्नॉलॉजी इन हायर एज्युकेशन फॉर ऍक्टिव लर्निंग’ या विषयावर दि. १२ ते १४ नोव्हेंबर २०२४ रोजी तीन दिवसीय कार्यशाळा गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे संपन्न झाली. एम. एस. एफ. डी. ए. (महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमी) आणि सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे या संस्थांच्या संयुक्तविद्यामाने ही कार्यशाळा घेण्यात आली. महाविद्यालयीन प्राध्यापकांना अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापनामधील नव्या बदलांसंबंधी आणि कौशल्यांसंबंधी प्रशिक्षण देणे हा या कार्यशाळेचा हेतू होता. पंचवीस प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०९.३० वा. कार्यशाळेचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर, पीएमउषा समन्वयक शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, एम. एस. एफ. डी. ए. चे श्री. गणेश भिसे, सिम्बॉयसिस चे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. सोफिया गायकवाड, डॉ. अश्विनी वडेगावकर, श्री. सागर जोशी उपस्थित होते. प्राचार्यांनी महाविद्यालयाच्यावतीने सर्वांचे स्वागत केले. तसेच कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याचे घोषित करून शुभेच्छा दिल्या. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.
त्रिदिवसीय कार्यशाळेत बारा सत्र घेण्यात आली. यातील प्रत्यक्ष आंतरक्रियात्मक आठ सत्रे होती. तीन सत्रे संगणक प्रयोगशाळेत झाली. एक सत्र ऑनलाईन पद्धतीने झाले. कार्यशाळेत डॉ. सोफिया गायकवाड यांनी अँड्रोगॉजी, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग आणि टेक्नॉलॉजी टूल्स यांचा आंतरक्रियात्मक अध्ययन अध्यापनातील वापर याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. अश्विनी वडेगांवकर यांनी मूल्यमापन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सुनंदा रॉय यांनी सहकारी अध्ययन प्रक्रियेवर प्रकाश टाकला हे सत्र ऑनलाइन पद्धतीने प्रभावीपणे झाले. श्री. गणेश लोखंडे यांनी ऍक्टिव लर्निंग स्ट्रॅटेजीस् याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.गणेश शिंदे यांनी आयसीटी टूल्स आणि मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस यांच्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कृतीआधारित सत्रांमध्ये प्राध्यापकांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी उपयुक्त अनेक तंत्रांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले. संगणक प्रयोगशाळेतील सत्रांमध्ये प्राध्यापकांना त्याचे प्रत्यक्ष उपयोजन करण्याची संधी मिळाली. नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत विषयज्ञान, अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा सक्रिय वापर या त्रिसूत्री मध्ये प्राविण्य मिळवणे प्राध्यापक वर्गास आवश्यक आहे हे या कार्यशाळेतून समोर आले. तज्ज्ञांनी ऑनलाइन अध्ययन अध्यापनाची कालसुसंगतता सांगतानाच प्रत्यक्ष वर्ग अध्यापनही अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. तीन दिवस संपूर्ण कार्यशाळेत सर्वांनी सक्रिय सहभाग दर्शविला.
कार्यशाळेचा समारोप आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ४.३० वा. पार पडला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, पीएमउषा समन्वयक शास्त्रशाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सिम्बॉयसिसचे श्री. गणेश लोखंडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सहभागींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. सहभागी प्राध्यापकांनी कार्यशाळेविषयी आपले मनोगत या कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. वनश्री तांबे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर यांनी कार्यशाळा सुरळीत पार पडल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.