गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियान २०२५ या वाचन विषयक उपक्रमांतर्गत शुक्रवार दि. ०३ जानेवारी २०२५ रोजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंतीचे औचित्यसाधून ‘महिला विषयक’ ग्रंथ संग्रहाचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्र गोस्वामी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, ग्रंथालय समितीच्या समन्वयिका डॉ. कल्पना आठल्ये, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, डॉ. निधी पटवर्धन, डॉ. एस. डी. मधाळे, डॉ. शिवराज गोपाळे, डॉ. दानिश गनी, प्रा. विद्याधर केळकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याची समग्र माहिती दिली.
उपस्थितांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियान २०२५ या वाचन विषयक अभियानाची आणि महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध वाचन विषयक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. पुस्तके आणि वाचक यांचा परस्पर सबंध असून प्रत्येक वाचकाने आपल्या आवडीचे पुस्तक वाचले पाहिजे; त्यावर चिंतन केले पाहिजे तसेच या चिंतनातून काहीतरी लिहिले पाहिजे असा विचार मांडला. अभ्यासाव्यतिरिक्त आपण आपली अवांतर वाचनाची आवड जोपासली पाहिजे. त्यातून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळेल; असा आशावाद व्यक्त केला. जगातील उत्तमोत्तम पुस्तके आपण वाचली पाहिजेत आणि त्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे असे सांगून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला विषय पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानात महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाने वाचन प्रेरणा विषयक उत्तम उपक्रम हाती घेतल्याने सहभागी सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
सदर ग्रंथप्रदर्शन वाचकांसाठी दोन दिवस खुले राहणार आहे. या कार्यक्रमाला प्राध्यापक, अध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
< |