gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे ‘राजर्षी शाहू महाराज जयंती’ आणि ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे गुणविशेष विषद केले. ते म्हणाले, राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. ते एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते. तसेच त्यांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. विद्यार्थ्यांसाठी उत्तम वसतिगृहांचे निर्माण केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली; अशाप्रकारे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी खर्च केले. आपल्या मनोगताच्या अखेरीस प्राचार्यांनी सर्वांतर्फे छ. शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन डॉ. रामा सरतापे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या विविध शाखांचे उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांनी छ. शाहू महाराजांना पुष्पांजली अर्पण केली.

राजर्षी छ. शाहू महाराज जयंती1 राजर्षी छ. शाहू महाराज जयंती2 राजर्षी छ. शाहू महाराज जयंती3 राजर्षी छ. शाहू महाराज जयंती4
Comments are closed.