आषाढ शुद्ध प्रतिपदेला कालिदासाच्या साहित्याचा गौरव म्हणून कालिदास दिन साजरा केला जातो. कालिदास रचित सप्तकलाकृतींपैकी मेघदूत या जगप्रसिद्ध अशा खंडकाव्याच्या दुसऱ्या श्लोकामध्ये आलेल्या “आषाढस्य प्रथम दिवसे” या शब्दयोजनेमुळे हा दिवस महाकवी कालिदासाला समर्पित करण्यात येतो.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातही दरवर्षी कालिदास दिन कार्यक्रम आयोजित केला जातो त्यानिमित्ताने यावर्षी दि. २६ जून २०२५ रोजी महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये या क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी संस्कृत विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यापैकी कालिदास दिन हा महाविदयालयाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर येणारा पहिला कार्यक्रम असून महाविद्यालयातील संस्कृतविषयात एम.ए. पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करतात. यावर्षी ही संधी श्रावणी फडके व प्रीती टिकेकर या विद्यार्थिनीनी घेतली व कालिदासाविषयी विचार व्यक्त केले. कु. श्रावणी फडके हिने समग्र मेघदूताचा आढावा घेत त्यातील सौंदर्यस्थळांच्या आधारे उमगलेल्या कालिदासाचा परिचय करून दिला. कु. प्रीती टिकेकर हिने कालिदासाची नाटके, महाकाव्य, लघुकाव्य यांतील वर्षा ऋतूवर्णनाचे संदर्भदेत निसर्गप्रेमी कालिदासाचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाची सुरुवात तृतीय वर्षाचा विद्यार्थी गुरुराज ठाकुरदेसाई याने कालिदासाच्या साहित्यातील निवडक श्लोक गायनाने केली. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांचा परिचय व गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कालिदास दिनाची परंपरा याविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्कृत विभागप्रमुख व कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ.कल्पना आठल्ये यांनी केले आणि कालिदासाच्या साहित्याचा व जीवनाचा थोडक्यात परिचय करून देताना कालिदास दिन कशासाठी साजरा केला जातो यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अंतीम टप्यात तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. पूर्वा खाडिलकर हिने आभारप्रदर्शन केले आणि शान्तिमन्त्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही कु. पूर्वा खाडिलकर हिने केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात महाविदयालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.







Visitors Online : 2