गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयात ७९वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद साखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी प्रा. डी. आर. वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाद्यवृंदावर राष्ट्रगीताची धून सादर केली. प्राचार्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थांना स्वातंत्र्यदिनी घ्यावयाची शपथ दिली. लेफ्टनंट प्रा. स्वामिनाथन भट्टर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट प्रा. दिलीप सरदेसाई यांनी केले. त्यानंतर मुख्य इमारतीत गणित विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि महिला विकास कक्षाच्या ‘मिळून साऱ्याजणी’, राष्ट्रीय सेवा योजना इत्यादी विभागांनी विविध थीमवर आधारित भित्तीपत्रकाचे अनावरण मा. प्राचार्य आणि अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘भारतीय स्वातंत्र्य लढा’ या विषयाला वाहिलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्यांच्या हस्ते संपन्न झाले.
महाविद्यालयाच्या वाणिज्य इमारतीमध्ये संपन्न झालेल्या मुख्य समारंभात उपस्थित सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी ‘सायबर सुरक्षा’ विषयक शपथ दिली. महाविद्यालयाच्या वाणिज्य इमारतीमध्ये संपन्न झालेल्या मुख्य समारंभात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले.वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ‘मशाल’ तसेच अर्थशास्त्र विभागाच्या ‘अर्थशोध’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन संपन्न झाले. या प्रसंगी विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गुणगौरव करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालय, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी करीत असलेल्या विविध क्षेत्रातील नैपुण्याचा आढावा घेतला. स्वातंत्र्याचा सन्मान तसेच भ्रष्टाचारासारख्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले. युवकांनी उज्ज्वल भारत भविष्यासाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयात या वर्षी नव्याने सुरु करण्यात आलेल्या विज्ञान शाखेत ‘डेटा सायन्स’ आणि वाणिज्य शाखेत ‘एमबीए’ अभ्यासक्रमाची माहिती दिली. महाविद्यालयातील संशोधन केंद्रातून अनेक विद्यार्थ्यांना पी.एचडी. मिळाली असून अनेक शिक्षकांनी उच्च पात्रता प्राप्त केली आहे याचे कौतुक प्राचार्यांनी आपल्या भाषणात केले.
पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी इमारतींची कामे सुरू असून, पुण्यातील सार्थक फाउंडेशनतर्फे गरीब विद्यार्थ्यांच्या फी भरण्यास प्रा. श्री. दामले सर यांनी मदत केली आहे. CEP (सामुदायिक सहभाग कार्यक्रम) या विषयाचे काम पूर्ण करण्यसाठी महाविद्यालयातील मराठी विभागाने ‘समजात कसे पोहोचवायचे’ या अनुषंगाने मंगळागौर कार्यक्रम राबविला व विद्यर्थ्याना अर्थार्जन करण्याचे संधी प्राप्त झाली. ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत करिअर संसदेचे गठन झाल्याने विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे; महाविद्यालयात सुरु असणाऱ्या अशा अनेक उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला.
याप्रसंगी व्यासपीठावर र. ए. सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि कला, वाणिज्य व शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. सीमा कदम, डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते. यानंतर सांस्कृतिक विभागाच्यावतीने देशभक्तीपर समूहगीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्राध्यापक, अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार मानले.
![]() |
![]() |








Visitors Online : 1