गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
गोगटे – जोगळेकर महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित कोकणातील एक प्रथितयश आणि नामवंत स्वायत्त महाविद्यालय असून,महाविद्यालयाने NAAC मूल्यांकनात सातत्याने चार वेळा ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांची महाविद्यालयाला ‘उच्च गुणवत्ताक्षम महाविद्यालय’ म्हणून मान्यता मिळालेली असून, मुंबई विद्यापीठाने देखील महाविद्यालयास ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ म्हणून गौरविले आहे.
मार्च, २०२४ मध्ये भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) योजनेअंतर्गत महाविद्यालयाला पाच कोटी रुपयांचे प्रकल्प अनुदान मंजूर झाले. या अनुदानांतर्गत भविष्यात हेरिटेज दर्जा असलेल्या मुख्य वास्तूचे पुर्ननूतनीकरण, नवीन इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. याच योजनेंतर्गत महाविद्यालयातील विविध शैक्षणिक विभागांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र, कौशल्य विकसन आणि व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासवर्ग, विविध कार्यशाळा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्यावतीने दि. १२ सप्टेंबर आणि दि. १३ सप्टेंबर, २०२५ रोजी ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटनलोकसभेच्या माजी सभापती श्रीमती सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार असून, याप्रसंगी पुणेस्थित डॉ. लीना बावडेकर यांचे बीजभाषण होणार आहे. परिषदेच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीम. विजया रहाटकर उपस्थित राहणार आहे.
या परिषदेत अमेरिकेतील अटलांटाचे महापौर आंद्रे डिकन्स, ऑस्टेलियामधील वरिष्ठ विज्ञान संशोधिका लॉराविल्यम्स, यूकेस्थित ब्रिर्गिटजलाव आदिमान्यवर साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार असून, देश-विदेशातील प्रतिष्ठीत व्यक्ती सामूहिकगट चर्चेत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणेसं शोधक महिलांविषयक विविध प्रश्न आणि पैलूंवर भाष्य करणाऱ्या शोधनिबंधाचे सादरीकरण करणार असून, विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान, स्त्रीशिक्षण, समानता, त्यांचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर परिषदेत विचारमंथन होणार आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरिता र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएम-उषा महाविद्यालयीन समन्वयक व शास्त्र शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम आणि अन्य आयोजक सदस्य परिश्रम घेत आहेत.
ही परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरुपात होणार असून, परिषदेत होणाऱ्या विचारमंथनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.







Visitors Online : 2