२०४७ मध्ये आपण स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करीत असून, देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. या धोरणात अन्य घटकांबरोबरच सक्षम स्त्री, केंद्रस्थानी असून, महिला सक्षमीकरण हा त्यातील कळीचा मुद्दा आहे. सामाजिक – आर्थिक विकास जसजसा होईल तसतसा स्त्रीचे अधिकाधिक सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे यांनी येथे केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) योजनेअंतर्गत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या अनुदानाअंतर्गत महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्यावतीने दि. १२ आणि दि. १३ सप्टेंबर२०२५ रोजी ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन हॉटेल विवा, मारुतीमंदिर, रत्नागिरी येथे करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन पुणेस्थित रमा पुरुषोत्तम फाउंडेशनच्या संचालिका श्रीम. चित्रा बुझ्रुक यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रा. कश्मिरा सावंत यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महिला विकास कक्षाच्या आणि परिषदेच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम यांनी महाविद्यालयातील कक्षाच्यावतीने आयोजित केले जाणारे विविध उपक्रम, परिषदेच्या आयोजनामागील पार्श्वभूमी, उद्देश विशद केला. डॉ. निधी पटवर्धन यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते उद्घाटक श्रीम. चित्राताई बुझ्रुक आणि मुख्यनिमंत्रित श्रीम. वैदेही रानडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते परिषदेत सादर केल्या जाणाऱ्या शोधनिबंधाचे पुस्तक रूपात प्रकाशन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आपल्या मनोगतातून रत्नागिरी शिक्षण संस्था, संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव तथा ज. वा. जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याकाळी महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी केलेले कार्य, महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत महाविद्यालयाने अध्ययन – अध्यापनाबरोबरच नवीन सुरू करण्यात आलेले अभ्यासक्रम, कला, क्रीडा, संशोधन अशा विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. महाविद्यालय पुढेही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही देऊन परिषदेला शुभेच्छा दिल्या.
श्रीम. रानडे पुढे म्हणाल्या, रत्नागिरी जिल्ह्याला शिक्षण, समाजसेवेचा एक सक्षम आणि समर्थ असा ऐतिहासिक वारसा लाभला असून, साक्षरतेच्या दृष्टीने जिल्ह्याने फार मोठे काम केले आहे. भारतीय संविधान हे महत्वाचे दस्तावेज असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने संविधान निर्मात्यांनी अत्यंत मोलाच्या तरतुदी संविधानात केल्या आहेत. या संदर्भात संविधानातील महत्वाच्या तरतुदींचा आढावा घेऊन त्यांनी लिंगसमानता, त्यातील जुनी – नवी आव्हाने, महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन – प्रशासनाने उचचलेली पावले, त्यासाठी केलेले प्रयत्न, एक महिला प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवेच्या काळात आलेले विवि धअनुभव अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
श्रीम. चित्रा बुझ्रुक म्हणाल्या, समाजात स्त्री – पुरुष समानता आणण्यासाठी पुरुषांबरोबर महिलांनीदेखील आपली मानसिकता बदलली पाहिजे. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, संस्कृती टिकविण्यासाठी स्त्रीचे योगदान अत्यंत महत्वाचे असून, जेव्हा आपण महिला समानता, त्यांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलतो त्यावेळीच दुसऱ्या बाजूला समाजात निर्माण होणाऱ्या नवनवीन समस्या, आव्हाने यांचा आपल्याला सामना करावा लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी स्त्री आणि पुरुषांनीही प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक बांधिलकी जपणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन होत्या. आपले विचार मांडताना त्या म्हणाल्या, भारतीय संस्कृती अत्यंत महान, श्रेष्ठ संस्कृती असून, ती टिकविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. कुटुंबव्यवस्था टिकवण्यात स्त्रीची भूमिका महत्वाची असून, भविष्यात तिला तडा जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. महिला सक्षमीकरणाबरोबरच स्त्रियांनी तर- तम-भावसांभाळणे गरजेचे असून, सामजिक विकासासाठी तिने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
परिषदेच्या बीजभाषक डॉ. लीना बावडेकर यांनी आपल्या भाषणातून भारतीयत त्त्वज्ञान आणि संस्कृती, प्राचीन काळापासून ते आधुनिक काळातील कला, साहित्य, सांस्कृतिक, प्रशासन, विज्ञान, माहिती – तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा आढावा घेतला.
या परिषदेत संशोधकांनी तीन सत्रांमध्ये महिलांविषयक विविध प्रश्न आणि पैलूंवर भाष्य करणाऱ्या ८२ शोधनिबंधाचे सादरीकरण केले. याशिक्षण, समानता, सबलीकरणया विषयांवरील सत्रांचे अध्यक्षस्थान प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्रठाकूरदेसाई, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ॲड. आशिषबर्वे, दिशांतर संस्थेच्या संस्थापक सचिव श्रीम. सीमा यादव यांनी, तर सामूहिक गटचर्चेचे अध्यक्षस्थान डॉ. यास्मिन आवटे यांनी भूषविले. प्रमुख निमंत्रित म्हणून ऑस्टेलियामधील वरिष्ठ विज्ञान संशोधिका लॉरा विल्यम्स, यूकेस्थित ब्रिर्गि टजलाव, अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. राज्यातील स्नोहोमिश शहराच्या महापौर लिंडा रेडमन यांच्यासह देश – विदेशात कार्यरत प्रतिभा छाबरा, भाविनी पटेल, मनिषा कंद, दीपा मेनन, अक्षता दाभोळकर आदी मान्यवरांनी पार पडलेल्या सामूहिक गटचर्चेत सहभागी होऊन महिलांविषयक विविध पैलूंवर प्रकाश टाकला. जॅलोव्ह यांनी कम्युनिटी रेडिओ आणि महिलांच्या विकासासाठी कम्युनिटी रेडिओचे महत्त्व, तर रेडमन यांनी महिलांची सामाजिक पार्श्वभूमी, सामुदायिक गरजा आणि सहयोगी दृष्टिकोनाचे महत्त्व यावर भाष्य केले.
स्त्री प्रश्न, स्त्रीवादाच्या अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या आणि दिलासा संस्थेच्या प्रमुख डॉ. रुपा शहा यांनी आपल्या उस्फूर्त आणि ओघवत्या भाषाशैलीतून शाश्वत विकास म्हणजे काय ते सांगून स्त्रियांचे समाजातील स्थान, त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आणि मर्यादा, स्त्री शिक्षण, आजही अस्तित्वात असलेला स्त्री-पुरुषभेद, निर्णय प्रक्रियेत असलेले नगण्य स्थान, स्त्रियांचा राजकीय सहभाग, त्यातील उदासीनता अशा सर्वांगीण बाबींवर परखडपणे भाष्य केले. स्त्री आणि पुरुष ही दोघेही समाजाची दोन चाके असून, दोघांनीही एकमेकांना समजून वाटचाल केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
परिषदेच्या समारोपप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. योगिनी घारे या प्रमुख अतिथी म्हणून ऑनलाईन स्वरुपात उपस्थित होत्या. शाश्वत विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, शिक्षण, समता आणि सबलीकरण हे केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी उपयुक्त आहे. समाजात स्त्रियांना अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागला असून, वर्षानुवर्षे जी स्वातंत्र्य – समतेची बंद असलेली कवाडे खुली करून देण्यात समाज सुधारकांचे खूप मोठे योगदान असून, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्रीला शिक्षण मिळायला सुरुवात झाली. स्त्री जरी शिकली असली तरी तिने आपले सामाजिक भान जपणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुरूप आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. विकास प्रक्रियेतून स्त्रियांना वगळणे म्हणजे विकासाच्या प्रक्रियेस खिळ घालण्यासारखे असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.
समारोपीय अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी परिषदेत झालेल्या विचारमंथनाचा आढावा घेतला.
ही परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरुपात पार पडली. परिषदेच्या यशस्वी आयोजना करिता र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन, तर पीएम –उषा महाविद्यालयीन समन्वयक व शास्त्रशाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णाकुलकर्णी, महिला विकास कक्ष आणि परिषदेच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम, आयोजन सचिव प्रा.अश्विनी देवस्थळी, कला आणि वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. सीमा कदम यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.
![]() |








Visitors Online : 2