gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) ‘मराठी वाङ्मय मंडळाचे’ उद्घाटन संपन्न

“आपली मराठी भाषा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यात तंत्रज्ञानाला सोबत घेऊन कशी बहरू शकते याचा विचार आपणच करायला हवा.” असे प्रतिपादन मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले. दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या कै. ज. शं. केळकर सभागृहात मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे यांनी प्रतिवर्षी मराठी वाङ्मयमंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, महाराष्ट्र राज्य सुकाणू समितीचे सदस्य असणारे डॉ. प्रदीप ढवळ यांनी विद्यार्थ्यांना बदलणाऱ्या शिक्षण पद्धतींविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या क्षमता ओळखून आपली ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि ध्येय निश्चित झाले की ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाषा आणि साहित्य या विषयांना कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत कशी होऊ शकते यासंदर्भात विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा वीर यांनी केले. या कार्यक्रमाला हिंदी, उर्दू, संस्कृत आणि इंग्रजी विभागाचे बहुसंख्य प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

MARATHI-DEPT-PROG-SEPT-25-1
Comments are closed.