प्रतिवर्षाप्रमाणे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘हिंदी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने दरवर्षी राष्ट्रभाषा हिंदी दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यमान वर्षी महाविद्यालयातील हिंदीविभाग आणि वाड्मयमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदी भाषेचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानास लांजा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुनिल चव्हाण हे प्रमुख पाहुणे व्याख्याते म्हणून लाभले.
कार्यक्रमाच्याप्रारंभी मुख्य इमारतीत विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या विविध लेखांच्या भित्तिपत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी हिंदी दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी, हिंदी दिनानिमित्त महाविद्यालयात आयोजित केले जाणारे उपक्रम यांची थोडक्यात माहिती दिली. प्रा. कृष्णात खांडेकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिंदी दिनानिमित्त महाविद्यालयाने सामंजस्य करार करण्यात आलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र आणि रोख स्वरूपातील पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यात आला. या निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. चित्रा गोस्वामी प्रा. कृष्णात खांडेकर आणि प्रा. गौरी बोटके यांनी काम पाहिले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. सुनिल चव्हाण यांनी हिंदी भाषा, तिचा उद्गम आणि विकास, समकाळातील हिंदी भाषेचे महत्त्व, हिंदी भाषेतील रोजगाराच्या विविध संधी अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला. भारतापुरत्या मर्यादित असलेल्या हिंदी भाषेने जागतिकीकरणाच्या काळात आपल्या सीमा ओलांडल्या आहे. विदेशातील अनेक विद्यापीठात हिंदी भाषेचे अध्ययन-अध्यापन होऊ लागले आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, महाविद्यालयात हिंदी विभागाच्यावतीने हिंदी दिनानिमित्त विविध अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेविषयी आस्था बाळगून हिंदी भाषेतील साहित्याचे अवांतर वाचन केले पाहिजे, समाजात हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार केला पाहिजे तसेच हिंदी विभागातील पीएच.डी. संशोधन केंद्रातून विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त करावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. गौरी बोटके यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाङमयमंडळाचे प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह प्राध्यापक उपस्थित होते.
![]() |







Visitors Online : 4