gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ सामूहिक गायन संपन्न

राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' सामूहिक गायन

“वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या रचनेला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यामध्ये वंदे मातरम् राष्ट्रीय गीत गायन कार्यक्रम ‘सार्धशताब्दी महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सामूहिक रित्या राष्ट्रीय गीत म्हणजेच वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन करून या गीताचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यासाठी महाविदयालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी उपस्थिती दर्शवली. ७ नोव्हेंबर १८७६ रोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम्’ या प्रार्थनागीताची रचना केली आणि नंतर हेच गीत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत एक महत्त्वाचे प्रतीक बनले होते तसेच आता देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचेप्रेरणास्रोत बनले आहे.

बंकिम चंद्र यांनी १८८१ मध्ये आपल्या ‘आनंद मठ’ कादंबरीत ‘वंदे मातरम्’ या गीताचा समावेश केला. १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात याचे पठण केले तेव्हा याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान हे गीत राष्ट्रवाद, एकता आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध प्रतिकाराचे प्रतीक बनले. दि. २४ जानेवारी १९५० मध्ये भारतीय संविधानाने ‘वंदे मातरम्’ हे ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून स्वीकारले आहे. १९५२ मध्ये ‘आनंदमठ’ या कादंबरीवर आधारीत त्याच नावाचा हिंदी चित्रपट तयार करण्यात आला.

भारताचे हे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ सर्व भारतीयांसाठी अपार महत्त्वाचे आहे. या गीताने भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे आणि ती आजही कायम आहे. आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची तसेच भारताच्या स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण राष्ट्र बनण्यासाठी पूर्वजांनी केलेल्या बलिदानाची आठवण या गीतातून होते. आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्याच्या आपल्या कर्तव्याची आठवण हे गीत करून देते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरळीतपणे संपन्न झाला.

 

 

राष्ट्रीय-गीत-वंदे-मातरम्-सामूहिक-गायन-1 राष्ट्रीय-गीत-वंदे-मातरम्-सामूहिक-गायन-4
Comments are closed.