गोगटे जोगळेकर महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या PM–USHA उपक्रमांतर्गत चालू असलेल्या ‘Exploring the Past: Investigating Historic Monuments and Archaeological Sites’ या Skill Enhancement Course अंतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट नुकतीच आयोजित करण्यात आली.
इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये वारसा-अभ्यास व स्थळनिरीक्षणाला प्राधान्य देण्यात येत असल्याने या क्षेत्रभेटीचे विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने बी. ए. आणि एम. ए. इतिहास विषयाच्या 31 विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षकांसह नुकतेच जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या विजयदुर्ग किल्ल्याला तसेच कनकादित्य (सूर्य) मंदिर, कशेळी या सांस्कृतिक वारशाने समृद्ध स्थळांना भेट दिली. क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्थळावर जाऊन किल्ल्यांची रचना, संरक्षण प्रणाली, सागरी मार्गावरील रणनीती, तसेच प्राचीन मंदिरांच्या स्थापत्यवैशिष्ट्यांचा व सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता.
या क्षेत्रभेटी दरम्यान पाऊलखुणा पर्यटन उपक्रम चालविणारे श्री. श्रीवल्लभ साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विजयदुर्ग किल्ल्याचे सामरिक महत्त्व, शिवकालीन दुर्गरचना, किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरचना आणि संरक्षण पद्धती, समुद्राशी असलेली जोडणी तसेच ऐतिहासिक लढायांतील भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कशेळीच्या कनकादित्य मंदिर परिसराला भेट देऊन या सूर्य मंदिराचा इतिहास, स्थापत्यशैली याबाबत माहिती मिळवली.
या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे, प्रा. मधुरा चव्हाण तसेच अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे शिक्षक श्री. निनाद तेंडुलकर यांनी संयुक्तपणे केले. प्रस्तुत उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी यांचे प्रोत्साहन आणि पाठबळ लाभले.





Visitors Online : 2