उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी आयोजित “वॉकेथॉन” उपक्रमात गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक आणि परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. जागतिक स्तरावर प्रतिवर्षी नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार हा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर आज रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आणि अशा दुखःद घटनांमध्ये प्रियजन गमावलेल्या कुटुंबांच्या दुःखाची जाणीव करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर रस्त्यावरील वाहतूक पीडितांसाठीच्या स्मरणार्थ रस्ता सुरक्षा विषयक वॉकेथॉन आणि पथनाट्य सारख्या जनजागृती कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले. जयस्तंभ ते मारुती मंदिर व मारुती मंदिर ते जयस्तंभ असा सदर वाँकेथॉनचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. सुरक्षित वाहतूक, हेल्मेटचा वापर, सीटबेल्टचे महत्त्व, वाहतूक नियमांचे पालन आणि अपघातमुक्त समाजाबाबत जनजागृती हा या वॉकेथॉनचा प्रमुख उद्देश होता.
शहरातील जयस्तंभ आणि मारुती मंदिर येथे गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी रस्ता सुरक्षा विषयक पथनाट्य सादरीकरण करून जाणीव जागृतीचा संदेश दिला. आपले प्रियजन सुरक्षित राहावेत तसेच वाहतूक नियमांचे पालन केले जावे यासाठीच संदेश या पथनाट्यातून देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मोटर वाहन निरीक्षक श्रीम. राजश्री पाटील, निरीक्षक श्री. गजानन कोळी, निरीक्षक श्री. केतन पाटील, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री. मोहसीन आवटी, सहा. निरीक्षक श्री. सत्यवंत पाटील, सहा. निरीक्षक श्री. अक्षय पाटील, सहा. निरीक्षक श्री. इंद्रजीत मोहिते, लिपिक श्री. गणेश नाचणकर, श्री. किरण दावलकर, श्रीम. राधा बसणकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे आणि विद्यार्थ्यांनी फलक व बॅनर्सच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती दिली. या उपक्रमाद्वारे समाजामध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
![]() |
![]() |
![]() |









Visitors Online : 0