क्विक हिल फॉउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्डस २०२६” या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पुण्यातील “विष्णुकृपा हॉल” येथे दि. २८ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांनी सायबर सुरक्षेबाबत केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला.
या भव्य अंतिम सोहळ्यात गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल तीन पुरस्कारांवर आपले नाव कोरले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा मान उंचावला आहे. महाविद्यालयाला बेस्ट सायबर स्मार्ट क्लब या गटात द्वितीय उपविजेतेपद (सेकंड रनर अप) मिळाले. सायबर सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे हा सन्मान मिळाला. तसेच, महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वैष्णवी शिरसाट हिला बेस्ट प्रेसिडेंट या गटात द्वितीय उपविजेतेपद मिळाले. तिच्या नेतृत्वाखाली सायबर क्लबने प्रभावीपणे अनेक उपक्रम राबवले. याशिवाय, रिद्धी जाधव आणि अथर्व सावंत या विद्यार्थ्यांच्या टीमला बेस्ट प्रोसेस कॉम्प्लायन्स वॉरिअर टीम या गटात प्रथम उपविजेतेपद (फर्स्ट रनर अप) मिळाले. सायबर नियमांचे काटेकोर पालन आणि प्रभावी अंमलबजावणी यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला.
या यशामुळे महाविद्यालयाच्या सायबर सुरक्षा क्षेत्रातील कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा सन्मान महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि सायबर सुरक्षिततेबाबतच्या बांधिलकीचा पुरावा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.






Visitors Online : 0