गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. शाहू महाराज यांनी जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना शिक्षण देणे हे आपल्या जीवनाचे ध्येय मानले. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे निर्माण केली. याखेरीज ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले; सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच समाजातील उच्च वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडेही लक्ष पुरवले. त्याकाळात त्यांनी अतिशय धैर्याने वंचित लोकांसाठी आणि संपूर्ण रयतेसाठी महान व क्रांतीकारी असे कार्य केले. आज आपण सर्वांनी त्यांच्या या विविध क्षेत्रातील कार्यामधून प्रेरणा घेऊन काही चांगला संकल्प केला पाहिजे. आजचा दिवस त्यासाठी महत्वाचा आहे; असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. सीमा वीर यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रीतीमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
![]() |
![]() |
![]() |









Visitors Online : 0