gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘करिअर संसदेचा शपथविधी सोहळा’ संपन्न – यशस्वी ‘नेतृत्वाच्या पाठीशी समाजासाठी केलेले काम असते’- प्राचार्य डॉ. साखळकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'करिअर संसदेचा शपथविधी सोहळा' संपन्न (2)

उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयीन स्तरावर मंत्री मंडळाप्रमाणे विद्यार्थ्यांची करिअर संसद स्थापन केली जाते. गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी या महाविद्यालयात गठीत करण्यात आलेल्या करिअर संसदेचा शपथविधी सोहळा जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

करिअर संसदेच्या मुख्यमंत्रीपदी वेदश्री विक्रांत फडके, नियोजन मंत्री मेघना राजेंद्र किंजळे, कायदे व शिस्त पालन मंत्री त्रिवेणी प्रशांत देसाई, सामान्य प्रशासन मंत्री शरा जमीर वागळे, माहिती व प्रसारण मंत्री झोया अबरार काझी, उद्योजकता विकास मंत्री नूतन महेश निंबरे, रोजगार-स्वयं रोजगार मंत्री तन्वी वैभव अडविलकर, कौशल्य विकास मंत्री करीना अतुल राणे, संसदीय कामकाज मंत्री पार्थ संदिप जाधव, महिला व बालकल्याण मंत्री इकरा अल्लाउद्दिन फणसोपकर आणि सदस्य म्हणून लौकिक किशोर उबाळे यांची निवड करण्यात आली.

युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ, महाविद्यालय व वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे जे उपक्रम राबविणे आवश्यक आहे, ते सर्वउपक्रम राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची. आपल्या वर्तणुकीतून युवकांमध्ये कोणत्याही पद्धतीचे भेद निर्माण होणार नाहीत याची काळजी घेण्याची. आपल्या कार्यकालामध्ये महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ राहील, सर्वयुवा मित्र-मैत्रिणी यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील व ते धूम्रपान विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची त्यांनी शपथ घेतली. निर्व्यसनी कर्तृत्वसंपन्न भविष्याचा वेध घेऊन पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून युवकांना योग्य वयात योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपक्रम युवकांच्या सहकार्याने युवकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करण्याचे. महाविद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी म्हणून माहाविद्यालयातील चांगल्या बाबींचा समाजमाध्यमांवर प्रचार आणि प्रसार करण्याचे तसेच समाजामध्ये दुही माजवणाऱ्या, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या कोणत्याही संदेशाचे प्रसारण किंवा प्रचार करणार नसल्याचे आश्वासन त्यांनी शपथ घेताना दिले..

करिअर संसदेच्या या नुतन पदाधिकाऱ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. साखळकर म्हणाले की, कोणत्याही यशस्वी नेतृत्वाच्या पाठीशी त्यांनी समाजासाठी निस्वार्थी भावनेने केलेले काम असते. त्यांनी शपथपत्रातील आशय आणि त्याचे समकालीन महत्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. करिअर संसद हे महाविद्यालय स्तरावर नेतृत्व करण्याची संधी देणारे व्यासपीठ आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात त्या महाविद्यालयाकडे सादर कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आणि महाविद्यालय विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमासाठी वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी करिअर कट्टा उपक्रमाचे समन्वयक डॉ. शिवाजी उकरंडे, प्रा. सुहास नागले, डॉ. अश्विनी देवस्थळी, डॉ. पंकज घाटे, प्रा. कृष्णात खांडेकर उपस्थित होते. करिअर कट्टा उपक्रमात सहभागी असलेले विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Comments are closed.