गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील वनस्पतीशास्त्र विभागात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. यावर्षी दि. १८ जुलै या दिवशी आगामी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बीजगोळे निर्मिती कार्यशाळा उत्साहात पार पडली.या कार्यक्रमाची सुरुवात वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी केली. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण या या संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि देशी वृक्षप्रजातींच्या संवर्धनासाठी सक्रिय सहभागाचे महत्त्व पटवून देत प्रेरित केले.
सदर कार्यशाळेमध्ये कोकोपीट व मातीच्या मिश्रणापासून मोह, फणस, आंबा, रीठा आणि चिंच या देशी वृक्षांच्या बियांचे बीजगोळे तयार करण्यात आले. या पद्धतीमुळे बीज अंकुरण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते. परिणामी स्वदेशी रोपांची निर्मिती करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रत्यक्ष सहभाग घेत बीजगोळे तयार केले. कार्यशाळेचे आयोजन व मार्गदर्शन डॉ. विराज चाबके व श्री. परेश गुरव यांनी केले. तसेच श्री. शरद आपटे व सौ. प्रियांका शिंदे-आवरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमात वनस्पतीशास्त्र विभागाचे द्वितीय व तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. संपूर्ण कार्यशाळा वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत पार पडली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांसमवेत प्रत्यक्ष बीजगोळे तयार करून त्यांच्या उत्साहात भर घातली तसेच वनस्पतीशास्त्र विभागाच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यशाळेत तयार करण्यात आलेले बीजगोळे आगामी वृक्षारोपण कार्यक्रमात वापरण्यात येणार असून, पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचे योगदान देणार आहे.
![]() |






Visitors Online : 0