gogate-college-autonomous-updated-logo

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्यावतीने ‘लोकमान्य टिळक यांना अभिवादन’

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील (स्वायत्त) ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) विभागाच्यावतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती प्रसंगी त्यांना आदरपूर्वक अभिवादन व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. आरती व गीता पठणाने कार्यक्रमाची सुरुवात. कार्यक्रमाचा प्रारंभ लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी लोकमान्य टिळकांची आरती केली व श्रीमद्भगवद्गीतेतील १२ व्या अध्यायाचे पठण करण्यात आले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. अपर्णा कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, सर्व कार्यक्रमाधिकारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या “स्वातंत्र्य टिकवणे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपण संघटित राहिलो नाही, तर इतर लोक आपले स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रहित नेहमी प्रथम लक्षात ठेवून स्वातंत्र्य टिकवणे ही काळाची गरज आहे. देश कसा मोठा होईल आणि आपण आपल्या देशासाठी काय योगदान देऊ शकतो, याचा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने केला पाहिजे!”

कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवकांनी आणि उपस्थितांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

Comments are closed.