शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात दि. २५ जुलै २०२६ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांची विशेष अभ्यास क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेत ‘चारसूत्री भात लावणी पद्धती’ सविस्तर समजून घेतली. या उपक्रमासाठी शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक डॉ. एन. जी. सोनोने यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तसेच कृषी सहाय्यक श्री. राजेश दीपक सावंत आणि श्री. अजय शंकर जाधव यांनी विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीदरम्यान मार्गदर्शन केले.
या क्षेत्रभेटीतीमध्ये भात लावणीत प्रत्यक्ष सहभाग २१ स्वयंसेवकांनी घेतला. विद्यार्थ्यांनी केवळ माहिती न घेता शेतात उतरून भात लावणीच्या विविध टप्प्यांतील कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. चिखलणीपासून ते रोपांच्या योग्य पुनर्लागवडीपर्यंतचा अनुभव त्यांनी घेतला. चारसूत्री पद्धतीचे प्रात्यक्षिक अनुभविले. पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या चारसूत्री भात लावणी तंत्रज्ञानाबद्दल अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये रोपांमधील योग्य अंतर, खतांचा संतुलित वापर आणि पाणी व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या घटकांची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. कृषी संशोधन व भाताच्या विविध प्रजातींची माहिती विद्यार्थांना देण्यात आली. कृषी संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेल्या व संकलित केलेल्या भाताच्या विविध नवनवीन प्रजाती, त्यांचे जतन, संकलन आणि शेतकऱ्यांपर्यंत होणारे वितरण याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. शेतीतील शाश्वततेसाठी माती आणि पाण्याची तपासणी (मृदा-जल परीक्षण) किती महत्त्वाची आहे, यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला व त्यासंबंधीच्या चाचण्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या अभ्यासू क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच शेतातील प्रत्यक्ष कामाचा मोलाचा अनुभव मिळाला.
कृषी क्षेत्रातील आधुनिक संशोधन आणि पारंपरिक पद्धतींचा मेळ कसा घालावा, हे समजण्यास या उपक्रमामुळे मोठी मदत झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले.
![]() |
![]() |
![]() |
![]() |









Visitors Online : 3