मुंबई विद्यापीठाच्यावतीने आयोजित ५९व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वरूप नेने याने उल्लेखनीय कामगिरी करत तबला वाद्यवादन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे. मुंबई येथे पार पडलेल्या या अत्यंत चुरशीच्या अंतिम फेरीत त्याने आपल्या प्रभावी आणि दर्जेदार तालवाद्य सादरीकरणाने रसिकांसह परीक्षकांची दाद मिळवली.
स्वरूप नेने याने श्री. विजय रानडे आणि श्री. केदार लिंगायत यांच्याकडे तबल्याचे प्राथमिक व मूलभूत शिक्षण घेतले असून, सध्या तो डोंबिवली येथील श्री. प्रवीण करकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्याचे पुढील प्रगत शिक्षण घेत आहे. केवळ वैयक्तिक वाद्यवादन स्पर्धेपुरता मर्यादित न राहता, स्वरूपने या युवा महोत्सवात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक संघातील शास्त्रीय गायन, सुगम गीत गायन, समूहगीत गायन, स्किट आणि कव्वाली अशा विविध प्रकारांमध्ये मुख्य साथीदार म्हणून समर्थपणे तबलासाथ करत आपल्या अष्टपैलू सांगीतिक प्रतिभेची छाप पाडली.
विद्यापीठाच्या प्रतिष्ठेच्या मंचावर महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावल्याबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांच्यासह प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वरूपचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या पुढील सांगीतिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.





Visitors Online : 1