
विद्यार्थी युवकांमध्ये भारतीय संसदीय लोकशाही, तिची मूल्ये, संसदीय कामकाज, त्यातील शिष्टाचार यांची ओळख व्हावी, तसेच त्यांच्यातील नेतृत्व, वक्तृत्व कौशल्ये विकसित व्हावेत, या हेतूने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कॅम्पस से संसद’ या उपक्रमात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. श्रावणी प्रभुमहाजन सहभागी झाली.
युवक वर्गात लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे, त्यांच्यातील विविध कौशल्य विकसन व्हावे आणि भविष्यात राष्ट्रबांधणीत तरुणांचा सहभाग वाढावा, या हेतूने राज्यसभा खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेला ‘कॅम्पस से संसद’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम व विद्यार्थी अभ्यास दौरा दि. २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवी दिल्लीत यशस्वीरित्या पार पडला. या अभ्यास दौऱ्यासाठी लेखी परीक्षा, मुलाखत अशा दोन टप्प्यांमधून महाराष्ट्र राज्यातून ३१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या अभ्यास दौऱ्यात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. श्रावणी प्रभुमहाजन सहभागी झाली.
या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी भारतीय संसद, राष्ट्रपती भवन तसेच नवी दिल्लीतील विविध ऐतिहासिक वारसास्थळे व संशोधन संस्थांना भेटी दिल्या. केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक मंत्री श्री. किरेन रिजीजू, माजी केंद्रीय मंत्री श्रीम. स्मृती इराणी यांच्यासह अनेक राजकीय व प्रशासकीय क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी घेऊन देशासमोरील प्रश्न, विविध समकालीन घडामोडी इ. वर विद्यार्थ्यांनी विचारमंथन केले.या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आयोजकांच्यावतीने एक अभ्यास कीट, प्रमाणपत्र देण्यात आले.
तिच्या या यशाबद्दल र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि डॉ. सीमा कदम यांनी अभिनंदन केले आहे. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख श्री. नीलेश पाटील यांनी काम पाहिले. या उपक्रमातील सहभागासाठी परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, संगणकशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे, विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्त्रबुद्धे, इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे, डॉ. सीमा वीर, प्रा. अक्षय झोरे, कार्यालयीन कर्मचारी, तिचे पालक आदिंसह अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.





Visitors Online : 1