गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिवस’ विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. तसेच मुंबई येथील नवकार बुक सेलर्स आणि जयपूर येथील गोविंद बुक्स सेलर्स यांच्या पुस्तक विक्रीचे प्रदर्शनही लावण्यात आले. याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या आणि ग्रंथालय समितीच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. डी. आर. वालावलकर, डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. मधुरा मुकादम, डॉ. सोनाली कदम, प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. वासुदेव आठल्ये, डॉ. दिवाकर करवंजे ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, प्रबंधक श्री. नंदकिशोर गोळपकर आणि इतर प्राध्यापक आवर्जून उपस्थित होते. सदर ग्रंथ प्रदर्शन दोन दिवस खुले ठरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी ग्रंथालयातील वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वाचनाला प्रवृत्त करणारी विविध विषयांना वाहिलेली आणि विविध विशेष दिवसांचे औचित्य साधून आयोजित केली जाणारी ग्रंथ प्रदर्शने विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा देणारी ठरतात असे सांगून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा या उपक्रमांना मिळणारा उत्तम प्रतिसाद विषद केला.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘वाचन ही एक सतत चालणारी प्रक्रिया असून आपण विविध प्रकारची आणि विविध विषयांना वाहिलेली पुस्तके सातत्याने वाचली पाहिजेत. ज्ञानार्जनाच्या गरजेमुळे आपल्या वाचनाला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळेल असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. एकूणच वाचन कमी होत चालले असल्याचे चित्र दिसून येत असून वाचन संस्कृती जोपाण्यासाठी आपण सर्वांनी विद्यार्थ्यांना अभ्यासेतर वाचनासाठी प्रवृत्त केले पाहिजे; सध्याच्या काळात ईबुक तसेच ऑडीओ पुस्तके असा वाचनासाठी एक महत्वाचा पर्याय उपलब्ध झाला असून आपण सर्वांनी त्याचा योग्य तो वापर करून ज्ञान संपादनाचे कार्य केले पाहिजे; असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.















Visitors Online : 0