gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनातून प्रा. कै. नेने सरांच्या स्मृति जागवल्या

nene sir smritigrantha

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाचे माजी विभागप्रमुख कै. भा. का. नेने यांच्या आठवणी नुकत्याच गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जागविल्या गेल्या. निमित्त होते कालिदास स्मृति समारोह व्याख्यानमालेच्या साठाव्या वर्षाचे. कै. नेने सरांच्या प्रेरणेतून सुरु झालेली ही व्याख्यानमाला पूर्वी शहरातील विविध ठिकाणी तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांसहित संपन्न होत असे. याही वर्षी नेने स्मृतिग्रंथ प्रकाशन समारंभाने सुरु झालेल्या या व्याख्यानमालेतील पुढील दोन दिवस प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक श्री. प्रा. के. घाणेकर यांची व्याख्याने आयोजित केली गेली. कै. नेने सरांचे अनेक विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यामध्ये सदर ग्रंथाचे प्रकाशन करणाऱ्या सौ. आशा गुर्जर व मेधाताई मराठे यांच्या पुढाकाराने व विशेष प्रयत्नातून ‘आपला भा. का. नेने’ हा स्मृतिग्रंथ तयार झाला. त्याचे प्रकाशन नेने सरांचे विद्यार्थी आणि सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ श्री. वसंतराव देशपांडे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. श्री. वसंतराव देशपांडे यांनी याप्रसंगी नेने सरांचे विशेष गुण व कार्य लोकांसमोर कथन केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कै. नेने सरांच्या आठवणी व महाविद्यालयातील त्यांचे कामकाज याविषयी माहिती दिली. तर कै. नेने सरांमुळे वाड्मयाची गोडी लागली आणि गांभीर्याने सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले पाहिजे हि गोष्ट लक्षात आली; असे विधान प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. श्रीकांत मलुष्टे यांनी केले. कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन होत्या. त्यांनी नेने सरांच्या स्मृतींमुळे त्यांचे अनेक पैलू लक्षात येतात. भविष्यात संस्था त्यांना अपेक्षित असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील विविध पैलूंचा विचार करील आणि त्यानुसार वाटचाल करत राहिल, असे आवर्जून सांगितले.

यावेळी नेने कुटुंबीयांनी त्यांचा जीवनप्रवास छायाचित्र सादरीकरणातून उलगडला, हे पहात असताना अनेकांना नेने सरांच्या सोबत घालविलेले दिवस आठवले. सौ. मेधाताई मराठे यांनी संयोजक म्हणून स्मृतिग्रंथ कसा घडला तो निर्मितीप्रवास सांगितला. तर गुरुऋणामुळे व्रत म्हणून स्विकारल्याने आज नेने सरांचा स्मृतिग्रंथ प्रकाशित होत असल्याचे फार समाधान होत आहे असे संपादिका आशा गुर्जर म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. विभागातील विद्यार्थांनी गायलेल्या संस्कृत गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला तर नेने सरांचे पुत्र श्री. अरविंद नेने यांनी उपस्थितांचे आभार मानले. व्यासपीठावरील मान्यवरांचा यावेळी महाविद्यालाच्यावतीने सत्कार करण्यात आला तसेच नेने कुटुंबियांच्यावतीने भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, संस्कृत शिक्षक, प्राध्यापक आवर्जून उपस्थित होते. नेने कुटुंबियांकडून अल्पोपहार आणि स्मरणिका देण्यात आली. या कार्यक्रमाला साजेसे नैपथ्य संस्थेच्या रमेश कीर कला आकादमीचे प्रशिक्षक प्रा. प्रदीप शिवगण यानि केले. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments are closed.