भारतीय समाजाला गवसलेली विकासाची दिशा घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे गवसली असून त्यांनी मांडलेल्या कालप्रस्तुत विचारांमुळेच विकास गंगा तळागाळापर्यंत पोचू शकली हे निर्विवाद सत्य असल्याचे मत अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे केंद्रीय अध्यक्ष श्री. दादा इदाते यांनी मांडले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
भारतीय समाजाच्या मुलभूत सत्वाला आणि तत्वाला थोडासाही ओरखडा ओढला जाणार नाही याची पूर्ण काळजी घेत त्यांनी शोषित समाजाच्या मुक्तीसाठी दिलेला लढा मानव मुक्तीसाठी प्रेरक ठरल्याचे सांगून डॉ. बाबासाहेबांचे चौफेर विचार भारतीयांसाठी उर्जा असल्याचे समजले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतेच्या मुक्तीचा लढा भारतातील लाखो लोकांसाठी लाभदायक ठरला आणि पुढील काळातही ठरेल. त्यामुळे सर्व भारतीयांनी त्यांचे आजन्म ऋणी राहिले पाहिजे; असे नमूद केले.
महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे केंद्रीय अध्यक्ष श्री. दादा इदाते, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे, कार्यक्रम समिती प्रपुख डॉ. शाहू मधाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविक मनोगतात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी या व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, वेगवेगळ्या व्याख्यानमालेचे आयोजन विद्यार्थांच्या बौद्धिक उन्नतीसाठी आवश्यक ठरत असल्याने महाविद्यालय नेहमी अशा व्याख्यानांचे आयोजन करते.
आपल्या अध्यक्षीय समारोपात कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी विद्यार्थांनी कसोशीने प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले. विविध उदाहरणांच्या आधारे त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या कृती कार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी प्रमुख वक्ते श्री. दादासाहेब इदाते, श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, श्री. सतीश शेवडे, डॉ. किशोर सुखटणकर यांचे हस्ते गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमान वर्षीच्या ‘सहकार’ अंकाचे प्रकाशन संपन्न झाले. तसेच डॉ. आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शहरातील प्रथितयश उद्योजक श्री. प्रवीण जोशी यांचे गीत गायनाने झाली. प्रास्ताविक समारंभ समिती प्रमुक डॉ. शाहू मधाळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि शहरातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.