गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाचा ‘वाचक गट’ उपक्रम असून या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता वाचनविषयक तसेच करिअर विषयक विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि या परीक्षांची तयारी याविषयी माहिती व्हावी आणि त्यांनी या क्षेत्रात आपले करिअर करण्यास पुढे यावे या उद्देशाने ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जि. प. रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा (आय.ए.एस.), असि. कमिशनर श्री. धनंजय कदम (आय.आर.एस.) आणि दिल्ली येथील ‘करिअर क़्वेस्ट अकादमी’चे संचालक श्री. संजीव कबीर लाभले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शक श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा, श्री. धनंजय कदम आणि श्री. संजीव कबीर यांचे महाविद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी स्पर्धा परीक्षा तुम्हाला देशाची सेवा करण्याची संधी देतात, लोकांच्या समस्या ओळखून स्वत:च्या प्रतिभेने त्यांच्यावर तोडगा काढणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे, जनता व शासकिय योजना यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे प्रशासकीय अधिकारी, हे एक आव्हानात्मक करिअर असून महिलांना विशेष आरक्षण असलेल्या परीक्षा तसेच दिव्यांग व्यक्तींनाही यामद्धे खूप छान कर्तृत्व दाखविण्याची संधी आहे. भावी काळात आपल्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात कार्य करावे अशी महाविद्यालयाची भूमिका आहे त्यासाठी या क्षेत्रातील मर्म जाणून घ्या. अशाप्रकारचे कार्यक्रम तुम्हाला या क्षेत्राची आवड निर्माण करून देण्यास निश्चितच मदत करतील. आजच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाकरिता खास उपस्थित असलेले अधिकारी आपणास नक्की प्रेरणा देतील असा विश्वास वाटतो. तसेच सदर अधिकारी महाविद्यालयाच्या प्रेमापोटी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्याप्रती विशेष धन्यवाद व्यक्त केले.
श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सुरवातीला आपले संपूर्ण करिअर कसे घडले ते उपस्थित विद्यार्थ्यांना विषद केले. प्रामाणिक प्रयत्नांना पर्याय नाही असे ठाम मत त्यांनी मांडले. प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या विषयांमध्ये विशेष आवड असताना स्पर्धा परीक्षांना आपण पसंती दिली असे ते म्हणाले. या परीक्षांची तयारी करताना पायाभूत विषय अभ्यासणे, आकलनशक्ती वाढवणे, वर्तमानपत्रात येणाऱ्या विविध विषयांशी निगडीत बाबींचे सखोल ज्ञान संपादन करणे, त्यावरून आपली मते निश्चित करणे; यासारखे यशाचे मंत्र दिले आणि विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेसंदर्भात विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
श्री. धनंजय कदम यांनी अभ्यास आणि छंद यांची सांगड घालता आली पाहिजे असे नमूद केले. विविध विषयांचे वाचन आणि विषय स्वत:च्या शब्दांत मांडता येणे खूप आवश्यक आहे असे सांगताना परीक्षेत धोका पत्करायला शिका, रोज वाचन आणि लिखाण करा, दुय्यम विषय निवड महत्वाची आहे. मुलाखत कौशल्ये आत्मसात करा असे ठळक मुद्दे मार्गर्दर्शन करताना समोर ठेवले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे उत्तमप्रकारे निरसन केले.
श्री. संजीव कबीर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्पर्धा परीक्षा मुलाखत, अभ्यासक्रम, व्यक्तिमत्व विकास, या परीक्षेविषयी मनाची तयारी कशी करावी याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आतापासूनच ध्येय ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यात कोणतीच हरकत नाही असे आवर्जून नमूद केले.
ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन यांनी कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्या विविध विद्यार्थीभिमुख योजना यामध्ये पुस्तक पेढी योजना, वेब ओपॅक, ई-बुक्स, ऑडीओ व्हिज्युल सुविधा, इंटरनेट, बहिस्थ विद्यार्थी योजना अशाप्रकारच्या सेवांविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
सदर कार्यक्रमाला श्री. राहुल आठल्ये, राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्ट. दिलीप सरदेसाई, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, महाविद्यालयातील विद्यार्थी, वाचक गटाचे विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचक गटाचा विद्यार्थी कु. विजय सुतार याने केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले.