gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्रातर्फे इस्रोच्या आदित्य मोहीमेचे थेट प्रक्षेपण

भारताची अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोची बहुचर्चित आदित्य एल १ मोहीम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. दिनांक २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी हे ‘आदित्य एल १’ आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील डॉ. सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सूर्याकडे प्रक्षेपित केले जाईल आणि भारतीय अवकाशभरारीचा एक नवा अध्याय लिहिला जाईल. इस्रोच्या PSLV-C57 या रॉकेटच्या मदतीने हे यान सूर्याकडे पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेतील वैज्ञानिक उपकरणे सूर्याच्या वातावरणाचा, जडण घडणीचा, सौर वादळांचा अभ्यास करणार आहेत. वैज्ञानिक आणि अवकाश हवामानाच्या दृष्टीने होणाऱ्या या अभ्यासामुळे या मोहिमेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे इस्रोच्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून केले जाणार आहे. तर नागरिकांनी आपापल्या ठिकाणाहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्रातर्फे करण्यात आले आहे. या मोहिमेविषयी, तसेच चांद्रयान ३ च्या शोधकार्याविषयी माहितीपर व्याख्यानाचे आयोजन लवकरच खगोल अभ्यास केंद्रातर्फे करण्यात येईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी . पी. कुलकर्णी यांनी दिली.

Comments are closed.