‘राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजाचे प्रश्न समजून घेऊन त्यावर आपणच उत्तर शोधणे व सर्वांनी एकत्र येऊन देशाला पुढे नेणे ही आजच्या युवकांची जबाबदारी आहे’, असे मत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी येथे व्यक्त केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अभिरूप युवा विधानसभा कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
विद्यार्थी युवकांना संसदीय आणि विधिमंडळीय कामकाजाची ओळख व्हावी, त्यांच्यातील वादविवाद, वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्य विकसित व्हावे, या हेतूने र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात अभिरूप युवा विधानसभेचे आयोजन करण्यात आले होते. याउपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतातून कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी अभिरूप युवा विधानसभा आयोजनामागील भूमिका उपस्थितांसमोर विशद केली.
अभिरूप विधानसभा कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताने होऊन कामकाजाला सुरुवात झाली. या अभिरुप युवा विधानसभेत विद्यार्थ्यांनीच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष नेते आणि सदस्यांची भूमिका बजावली. विधीमंडळाच्या सत्राच्या प्रोटोकॉलनुसार शोक प्रस्ताव, नवनिर्वाचित सदस्यांना शपथ, प्रश्नोत्तरांचा तास, तारांकित- अतारांकित प्रश्न, विधीनिर्मितीची प्रक्रिया, विधेयक सभागृहाच्या पटलावर मांडणे आणि त्यावरील प्राथमिक चर्चा, शून्य प्रहराचा तास, कामकाजाची समाप्ती इ. संसदीय कामकाजातील संकल्पनांचा अंतर्भाव करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे व्यावसायीकरण, रोजगारपूरक शिक्षण, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रश्न यांची साधकबाधक चर्चा केली. यामध्ये रिफायनरी प्रकल्प, नैसर्गिक संपत्तीचा वापर करून रोजगार निर्मिती, गडकिल्ल्यांची सद्यस्थिती आणि संवर्धन, लोककला संवर्धन, नवीन शैक्षणिक धोरण, वन्यप्राण्यांचा शेतीला होणारा उपद्रव इ. मुद्द्यांचा समावेश होता. राष्ट्रगीताने अभिरुप युवा विधानसभेची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना र. ए. संस्थेचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे म्हणाले, ‘राजकारणात सर्वच वाईट नसतात. काही असेही असतात, जे पोटतिडकीने जनतेचे प्रश्न मांडत असतात. त्यामुळे युवकांनी राजकारणात येणे अत्यंत गरजेचे आहे.’
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, ‘अभिरूप युवा विधानसभेच्या निमित्ताने विद्यार्थीदशेतच आपल्याला संसदीय कामकाजाची ओळख होऊन विविध गुणांचे विकसन आपल्यात होईल. आपण भविष्यातसकारात्मकपणे काम करू शकतो, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल.’ या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्न कसे विचारावेत? त्याची उत्तरे कोणत्या पद्धतीने द्यावीत? संसदीय आणि विधिमंडळ कामकाज कामकाज कसे चालते, याची जाणीवझाली, त्यामुळे हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी नियामक मंडळ सदस्य श्री. सचिन वहाळकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शक प्राध्यापकांनी घेतलेले परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. यानंतर प्राध्यापक आणि सहभागी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळीअभिरूप युवा विधानसभेतील सहभागी विद्यार्थिनी कु. सिद्धी सार्दळ आणि कु.स्वराली कनावजे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी व्यासपीठावर र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, नियामक मंडळ सदस्य श्री. सचिन वहाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य, तिन्ही शाखांच्या उपप्राचार्या, अभिरूप युवा विधानसभा कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. आनंद आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, सहसमन्वयक आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. निलेश पाटील, प्रा. सचिन सनगरे, प्रा. कृष्णात खांडेकर, प्रा. ऋजुता गोडबोले, प्रा. मोहिनी बामणे, डॉ. दिनेश माश्रणकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग आणि विद्यार्थी मंडळाचे प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश पाटील यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. आनंद आंबेकर यांनी केले.