गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वार्षिक ‘सहकार’ अंक म्हणजे महाविद्यालयाने वर्षभर राबविलेल्या शैक्षणिक व सहशैक्षणिक माहितीचा मूल्यवान दस्तऐवज असून, तो एक आदर्श ग्रंथ आहे, असे गौरवोद्गार मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी काढले. डॉ. १४ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या महाविद्यालयाच्या ‘सहकार’ वार्षिक अंकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
पाच भाषेतील साहित्य हा दुर्मिळ योग असून तो महाविद्यालयाच्या सहकार अंकामध्ये पाहायला मिळतो, असे सांगून शिक्षकांचे उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर केलेले भाष्य, विविध खेळाडूंनी राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखविलेले नैपुण्य यांची छायाचित्रे, प्राचार्यांनी वर्षभराचा मांडलेला लेखाजोखा यामुळे या अंकाचे साहित्यनिर्मितीतील उत्तुंग उंची गाठली आहे. हे सांगताना मला आनंद वाटतो, असे ते म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कार्यकारी संपादक प्रा. तुळशीदास रोकडे आणि संपादक मंडळ उपस्थित होते.
सहकार वार्षिक अंकाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले की, विद्यमान वर्षी महाविद्यालयाला सहकार अंक तशाचप्रकारे दर्जेदार बनविण्याचा प्रयत्न संपादकमंडळाने केल्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहे. योगिता प्रिंटर्स, रत्नागिरी यांनी हा अंक अल्पवेळेत पूर्ण करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त करून प्राचार्य पुढे म्हणाले की, विद्यार्थी साहित्यिकांनी एकाच विषयात गुंतून न राहता चौफेर ज्ञान मिळवून वेगवेगळ्या विषयावर लिहिले पाहिजे. या सहकारमध्ये असा प्रयत्न झाल्याचे पानोपानी जाणवते.
या प्रकाशन सोहोळ्यास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.