प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (पीएमउषा) ही केंद्र सरकारची योजना आहे जी उच्च शिक्षणासाठी अनुदान पुरविते. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत प्रवेशसंपादनता, गुणवत्ता, समानता, जबाबदारीत्व आणि माफकता या पाच स्तंभांना सहाय करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील ४९ महाविद्यालय या योजनेच्या अनुदानास पात्र ठरली आहेत त्यापैकी गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी हे एक महाविद्यालय आहे. या अनुदानातून महाविद्यालयात विविध चर्चासत्र,कार्यशाळा,परीषदा अशा शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. विद्यार्थांची गुणवत्ता सुधारणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधून अकॅडेमिक क्रेडीट बँक ही नवीन संकल्पना पुढे आली. त्यामध्ये उच्च शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांना मिळणारे क्रेडीट एकत्र संकलित केले जाणार आहेत. भारतात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधारकार्डप्रमाणेच १२ अंक असणारे युनिक नंबर चे एबीसी डिजिटल कार्ड मिळणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्म दिनांक, लिंग आणि त्याचा फोटो असणार आहे. त्यामध्ये एक क्यू आर कोड असणार आहे तो क्यू आर कोड स्कॅन करून विद्यार्थ्याला आपणास विविध विषयात मिळालेले क्रेडीट पाहता येणार आहेत. यापुढे विद्यार्थ्याला पाहिजे त्यावेळी, कोणत्याही ठिकाणी आपले क्रेडीट दाखविता येणार आहेत. त्यासाठी पारंपारिक गुणपत्रिकेची गरज असणार नाही. आता, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन डीजी लॉकर मध्ये अकॅडेमिक क्रेडीट बँक अंतर्गत सर्व गुणपत्रिका उपलब्ध होणार आहे.
दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘अकॅडेमिक क्रेडीट बँक’ यावर आधारित एकदिवशीय कार्यशाळेचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी असणार आहे. कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यशाळेकरिता महाराष्ट्र आणि दादरा-नगर हवेलीचे राज्य समन्वयक श्री. अभिषेक देब हे मार्गदर्शन करणार आहेत; या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी डॉ. विवेक भिडे (मोबा. 9421139296) आणि प्रा.अमोल सहस्रबुद्धे (मोबा. 8668406003) यांना संपर्क करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.